हिंडलगा येथे महिलांचे मतदारांना आवाहन
किणये : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्नाचा लढा गेल्या 66 वर्षापासून सुरू आहे. यापूर्वी सीमाभागातून समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी सर्व जनता खंबीरपणे उभी राहायची. यापूर्वी कोणीही कशाचीही अपेक्षा करीत नव्हते. अलिकडे मात्र राष्ट्रीय पक्षांकडून तरुणांना व महिलांना विविध प्रकारचे आमिष दाखविण्यात येत आहे. या आमिषांना बळी पडू नका. वाडवडिलांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी बराच त्याग केलेला आहे. काहीजणांनी प्राणाची आहुती दिली आहे. या साऱ्यांचे स्मरण ठेवा, स्वाभिमान बाळगा आणि खंबीरपणे समितीला साथ द्या. व ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना निवडून आणा, असे आवाहन हिंडलगा येथे महिलांनी केले आहे.
रविवारी रात्री हिंडलगा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीत चौगुले यांचे घागर हे चिन्ह असलेले फलक घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आमिषाला बळी न पडता सर्वांनी समितीच्या प्रवाहात या, असे सांगितले. माधुरी हेगडे, आक्काताई पाटील, बबिता कोकितकर आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हिंडलगा गावातील मरगाई गल्ली येथून आर. एम. चौगुले यांच्या प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. लक्ष्मी गल्ली, महादेव गल्ली, रामदेव गल्ली, नवी वसाहत, मांजरेकर कॉलनी, सिद्धार्थ कॉलनी या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन चौगुले यांनी गाठीभेठी घेतल्या.
नागेश किल्लेकर यांनी तरुणांना मार्गदर्शन करून समितीच्या झेंड्याखाली एकत्र या, असे आवाहन केले. त्यानंतर व्यायाम शाळेजवळ समितीच्या नेतेमंडळींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अॅड. सुधीर चव्हाण, रामचंद्र कुद्रेमनीकर, मनोहर किणयेकर, प्रकाश बेळगुंदकर आदींनी सीमाप्रश्न आणि ग्रामीणमध्ये चौगुले यांना निवडून आणण्यासाठी तरुणांनी व सर्व स्तरातील नागरिकांनी कसे प्रयत्न केले पाहिजेत, याबद्दल माहिती दिली. यावेळी यलाप्पा काकतकर, विनायक पावशे, मोहन नाईक, सुरेश सावगावकर, बाळू सावगावकर, सुरेश के. अगसगेकर, टी. एच. नाईक, सुनील अगसगेकर, अनिल हेगडे, संदीप मोरे, बळीराम किल्लेकर, सतीश नाईक, उदय नाईक, भाऊराव कुडचीकर, अर्जुन जतानी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









