‘भूत’ या प्रकाराने अनेकांना पछाडले आहे. हे केवळ भारतात घडते, अशी समजूत असेल, तर ती चुकीची आहे. इतर देशांमध्ये, अगदी वैज्ञानिकदृष्ट्या पुढारलेल्या आणि धनाढ्या देशांमध्येही ‘भुतांची’ भीती आहे. त्यांच्यापैकीच ब्रिटन हा देश आहे. या देशातील एक घटना सध्या बरीच चर्चेत आहे. या देशातील नॉटिंघम येथील एक घर किंवा बंगला सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. हे घर विकायला काढण्यात आलेले असून त्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 6 कोटी अशी लावण्यात आलेली आहे. हे घर अत्यंत अलिशान अशा स्वरुपाचे आहे.
या तीन मजली घराच्या परिसरात मोठे उद्यान, गॅरेज आदी महत्वाच्या सुविधा असून या घराचे वर्णन ‘फॉरएव्हर फॅमिली होम’ अर्थात कुटुंबासाठी सदैव सुविधाजनक घर असा करण्यात आला आहे. हे घर विकत घेण्याची संधी सोडाल, तर आयुष्यभर पस्तावाल, अशी याची जाहिरातही ते विकून देण्याचे कंत्राट घेतलेल्या विक्री कंपनीने केली आहे. या घराच्या बाह्याभागाची आणि आंतर्भागाची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तथापि, ग्राहकांची वानवा आहे.
या घराची छायाचित्रे ‘राईटमूव्ह’ नामक वेबसाईटवर टाकण्यात आली आहेत. असंख्य लोकांनी ती पाहिली आहेत. मात्र, ही छायाचित्रे पाहिल्यानंतर ब्रिटनमधील लोक आश्चर्यचकित आणि भयकंपितही होतात. कारण त्यांना या घराच्या छायाचित्रांमध्ये ‘भूत’ पाहिल्याचा भास होतो. या छायाचित्रांमध्ये एक असे आहे, की ज्यात अनेकांना हे भूत दिसले आहे. या छायाचित्रात आऊटडोअर टेबलाभोवती एक परिवार बसलेला दिसून येतो. या परिवारातील लोकांचे कपडे जुन्या पद्धतीचे आहेत. तसेच हे छायाचित्र बरेच पुसट आहे. त्यामुळे भुते बसल्यासारखा भास होतो. तर काही जणांना या जेम्स बाँड चित्रपटातील दृष्य पाहिल्यासारखे वाटते. या भासांचा इतका परिणाम लोकांवर होतो की ते हे घर घेण्यासाठी तयार होत नाहीत, असा अनुभव या घराची विक्री करणाऱ्या कंपनीला येत असल्याचे बोलले जाते. आता ब्रिटनसारख्या देशात लोकांच्या अशा समजुती असतील, तर भारतात तशा असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एका कुटुंबाच्या छायाचित्रात ब्रिटनमधील शाहण्यासुरत्या नागरीकांना ‘भूत’ दिसत असल्यास, भारतात कोणी आपण भूत पाहिले आहे, असे म्हणणारे लोक भेटले, तर त्याचे काही वैषम्य वाटण्याचे कारण नाही, असेही बोलले जात आहे.









