हस्तिनापूर नगरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची बैठक
कळंबा: रिंगरोडवरील हस्तिनापूर नगरी कॉलनीने दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ व सुंदर हस्तिनापूर नगरी या मोहिमेद्वारे परिसरातील नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता, सजावट आणि एकतेचा संदेश दिला.
हा उपक्रम २२ ऑक्टोबर रोजी हस्तिनापूर नगरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष अशोक बाबूराव पाटील व उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. सुमारे १५० कुटुंबांची ही कॉलनी सन २००५ पासून एकजुटीने कार्यरत असून, दरवर्षी सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कॉलनीतील बांधिलकी दृढ होत आहे. या वर्षी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कॉलनी स्वच्छ करून आकर्षक सजावट करण्यात आली.
प्रत्येक घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या, तर मुलींच्या सहभागातून रस्त्याच्या दुतर्फा कलात्मक रांगोळ्या काढण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला.
याशिवाय, सामुदायिक फराळ कार्यक्रम आयोजित करून रहिवाशांनी एकत्र येत बंधुतेचे दर्शन घडविले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विशाल दिंडोर्ले, प्रवीण पाटील, अविनाश कुंभार, वैभव कुंभार, विजय कांबळे, राजू जाधव, अनिकेत पाटील, अभिजीत खतकर, सुनील वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांत मंडळाच्या माध्यमातून कॉलनीत सांस्कृतिक हॉलचे बांधकाम, वीज व पाणीपुरवठा व्यवस्थेची देखभाल, गटर स्वच्छता, कचरा उठावाचे नियोजन, तसेच महिला मंडळाचे उपक्रम अशा अनेक कामांद्वारे परिसराचा विकास साधला आहे.








