पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा राजकीय यशाचा चढता आलेख
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला
राधानगरी मतदारसंघाबरोबरच पडली जिह्याच्या पालकत्वाची जबाबदारी
जिह्यातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आव्हान
कोल्हापूरः कृष्णात चौगले
राधानगरी मतदारसंघातील जनतेने प्रकाश आबिटकर यांचे आमदारकीच्या हॅटट्रिकचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर आरोग्यमंत्री ते थेट पालकमंत्री पद देऊन शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे आबिटकर यांच्यावर आपल्या मतदारसंघाबरोबरच राज्याचे आरोग्य मंत्रालय आणि कोल्हापूर जिह्याच्या पालकत्वाची जबाबदारी पडली आहे. साहजिकच एक जिल्हा नेतृत्व म्हणून त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे रेंगाळलेले जिह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच पर्यटन, कृषी विकास, उत्कृष्ट आरोग्य सेवा, शिक्षण, औद्योगिक विस्तार ते आयटी पार्क उभारण्यापर्यंतचे ‘शिवधनुष्य’ मंत्री आबिटकर यांना पेलावे लागणार आहे. जिह्याचे पालक म्हणून काम करताना त्यांना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन काम करण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागणार आहे.
गारगोटीतील युवा मंडळाचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, कॅबिनेट मंत्री ते जिह्याचे पालकमंत्री असा प्रकाश आबिटकर यांचा आजतागायतचा प्रवास आहे. सुरुवातीस युवा स्पोर्टस् अध्यक्षपदाच्या माध्यमातून नेतृत्वाला सुरुवात केली. त्यामुळे गेल्या 32 वर्षांपासून आजअखेर गारगोटी परिसरात ते अध्यक्ष म्हणूनच चर्चेत आहेत. महाविद्यालयीन कारकिर्दीत ते कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे जीएस झाले. 1997 ला ते भुदरगड पंचायत समितीवर अपक्ष म्हणून निवडून आले. 2002 पर्यंत त्यांनी ही धुरा सांभाळताना उपसभापती पदही सांभाळले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना सभागृह गाजवले. उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य हा पुरस्कारही त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात मिळवला. पुढे 2009 साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली. यावेळी सुमारे 40 हजार मते मिळालेल्या आबिटकर यांचा आत्मविश्वास दुणावला आणि ते अखंडीतपणे कार्यरत राहिले. जनसंपर्क वाढवला. यातूनच 2014 ला शिवसेनेच्या उमेदवारीवर आमदार झाले. त्यानंतर मात्र त्यांच्या राजकीय यशाचा चढता आलेख कायम राहिला आहे. आमदार म्हणून काम करताना त्यांनी सुरुवातीपासूनच विकासकामांचा धडका सुरु करून थेट जनतेशी संपर्क ठेवला. 2019 ला पुन्हा शिवसेनेचे आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा घेतलेला धाडसी निर्णय त्यांच्यासाठी महत्वाचा ठरला. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक केल्यानंतर त्यांना राज्यमंत्री नव्हे तर थेट कॉबिनेटमंत्री पदासह कोल्हापूरचे पालककत्व मिळाले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत वडील कामगार नेते आनंदराव आबिटकर आणि जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांचे मोलाचे योगदान आहे.
प्रलंबित प्रश्नांचा डेंगर अन् बेरोजगारीची समस्या
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर जिह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांबरोबरच बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याचे आव्हान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार आहे. त्यानुसार सध्या कार्यवाही सुरू झाली असली तरी राज्य आणि केंद्र सरकारकडून त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे सदर आराखडा पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी निधीची तरतूद करावी लागणार आहे. क्रीडा क्षेत्रातील विविधांगी विकासांमध्ये कोल्हापूर जिल्हा पिछाडीवरच आहे. केंद्र सरकारकडून रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी काही प्रमाणात निधी आला असला तरी मॉडेल रेल्वे स्टेशन आजही साकारलेले नाही. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची घोषणा झाली असली तरी हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात साकारणार कधी ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न तर गेली अनेक वर्षे रेंगाळला आहे. नदी प्रदुषण रोखण्यासाठी शासनाकडून आणि स्थानिक पातळीवर कोणत्याही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. खंडपीठाच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे कायम आहे. जिह्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत चालला असून त्यामुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे. मोठ्या औद्योगिक प्रकल्पाअभावी युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याचे चित्र आहे. तर आय. टी पार्कची वेळोवेळी घोषणा झाली असली तरी त्याला अद्याप मूर्त स्वरूप आले नसल्यामुळे उच्च शिक्षीत तरूणांना पुणे, मुंबईसारख्या शहरांची वाट धरावी लागत आहे.








