कोल्हापूर :
महापालिकेत अनेक वर्ष एकाच वॉर्डमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या 20 आरोग्य निरीक्षकांच्या सोमवारी तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. प्रशासक के. मंजुलक्ष्मी या प्रशासकीय ट्रेनिंगला जाण्यापूर्वीच ही ऑर्डर केल्याने आरोग्य निरीक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक आरोग्य निरीक्षकांनी बदली रद्द करण्यासाठी कारभारी नगरसेवकांकडे सोमवारी सकाळपासूनच फिल्डींग लावण्यास सुरुवात केली.
महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये वर्षानुवर्षे अनेक आरोग्य निरीक्षक ठाण मांडून बसले आहेत. यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न एरणीवर आला होता. याबाबत प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मागील आठवड्यात शहरात फिरती करुन आरोग्य निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविल्या होत्या. यानंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी प्रशासकीय ट्रेनिंगला जाण्यापूर्वी आरोग्य स्वच्छता विभागाला चांगलाच झटका दिला आहे.
विभागातील सर्वच 20 आरोग्य निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. याबाबतचे आदेश ट्रेंनिंगला जाण्यापूर्वीच करण्यात आले होते, सोमवारी सकाळी हे आदेश आरोग्य निरीक्षकांना लागू करण्यात आले.
बदली रद्दसाठी फिल्डींग
काही आरोग्य निरीक्षकांनी सोमवारी सकाळपासूनच बदली रद्द करण्यासाठी कारभारी नगरसेवकांकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आरोग्य निरीक्षकांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र ही ऑर्डर प्रशासकांनी केली असल्यामुळे आपण यामध्ये काहीच करु शकत नसल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा पर्यंत आरोग्य निरीक्षक महापालिकेमध्ये थांबून होते.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे
ऋषिकेश सरनाईक, माधवी मसुरकर, सौरभ घावरी, विनोद नाईक, मनोज लोट, शुभांगी पवार गीता लखन,महेश भोसले,सुशांत कावडे,श्रीराज होळकर,सुशांत कांबळे, नंदकुमार पाटील, मुनिर फरास विकास भोसले, दिलीप पाटणकर, स्वप्निल उलपे, भूमी कदम, विनोद कांबळे, नंदकुमार कांबळे, अनिकेत सुर्यवंशी








