अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची फ्रूटमार्केटमध्ये धाड : आंब्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात : फळे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर
बेळगाव : रसायने आणि इन्सुलिन पावडरचा वापर करून पिकविलेला आंबा हापूसच्या नावाखाली खपविणाऱ्या आंबा विक्रेत्यांच्या दुकानांवर अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांनी धाड टाकून आरोग्यासाठी घातक ठरणारा आंबा ताब्यात घेतला. तसेच तेथील दुकानदारांना सज्जड दम भरला. डॉ. जगदीश अलीकडेच जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. भेसळ, बनावट खाद्यपदार्थांची विक्री याची तपासणी करण्याची धडक मोहीम त्यांनी राबविली आहे. कार्बाईडसारखी रसायने वापरून आंबा पिकवून त्याची विक्री होत असल्याची तक्रार त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी फ्रूटमार्केटमध्ये जाऊन तपासणी केली. या तपासणीमध्ये त्यांनी विक्री परवाना, स्वच्छता याचीसुद्धा काटेकोरपणे तपासणी केली. य् ाावेळी बहुसंख्य आंबाविक्रेते कार्बाईड रसायने वापरून आंबा पिकवत असल्याचे आढळले. मुख्य म्हणजे चाळीस विक्रेत्यांपैकी केवळ पाच जणांकडे व्यवसाय परवाना आढळला. याबद्दल डॉ. जिंगी यांनी विनापरवाना विक्री करणाऱ्या फळविक्रेत्यांची चांगलीच हजेरी घेतली. मुख्य म्हणजे रसायनांबरोबरच इन्सुलिन पावडरचा वापर करून आंबा पिकवला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा पद्धतीने पिकविलेले आंब्यांचे नमुने त्यांनी ताब्यात घेतले. शिवाय 22 जणांना नोटीसही बजावली.
केळी वखारींवर कारवाई कधी?
केळी हे सर्वसामान्यांचे आवडते आणि स्वस्तातले फळ आहे. मात्र, केळी लवकर पिकण्यासाठी वखारमालक केळ्यांचे फणे किंवा घड रसायनांमध्ये बुडवून थप्पी लावून रचतात. यामुळे केळी एका दिवसात पिकून पिवळी होतात. मात्र, ही केळी चवीला सपक असतात आणि ती जास्त दिवस न टिकता काळी पडून खराब होतात. शिवाय रसायनांमध्ये पिकविल्याने मानवी शरीराची हानी होते ती वेगळीच. त्यामुळे वखारचालकांवरही कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
रसायनांचा वापर करणे गुन्हा
कोणत्याही विक्रेत्याला खाद्यपदार्थ विकण्याचा अधिकार नक्कीच आहे. मात्र, भेसळ करणे, बनावट उत्पादन विकणे किंवा कृत्रिम रसायनांचा वापर करून फळे पिकवून ती विकणे, हा गुन्हा आहे. आंबा विक्रेत्यांना वारंवार याबद्दल समज देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे पुन्हा फ्रूटमार्केटला जाऊन तपासणी करून ही कारवाई करणे भाग पडले. विक्रेते काही पैशांसाठी असे कृत्य करतात. परंतु, सामान्यांच्या जीवाला त्यामुळे हानी पोहोचते. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे सर्वच विक्रेत्यांना कोणतीही रसायने वापरून फळे पिकवू नयेत, तसेच भेसळ करू नये, जर असे करत असल्याचे आढळून आल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाईल. कृत्रिमरित्या पिकविलेल्या आंब्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहेत.
-डॉ. जगदीश जिंगी









