प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात रहदारी पोलीस प्रशासन अपयशी : ट्रॅफिक सिग्नल-सीसीटीव्ही ठरताहेत कुचकामी

प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासह विविध चौकांतील केंडीवर नियंत्रण ठेवण्याकरिता चौकात ट्रॅफिक सिग्नल सुविधा आणि सीसीटीव्ही पॅमरे बसविण्यात आले आहेत. पण या यंत्रणेचा आधार घेऊन वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी केवळ दंडात्मक कारवाई करण्यात रहदारी खात्याचे अधिकारी व पोलीस व्यस्त आहेत. यामुळे काही चौकात सुरू केलेली सिग्नल यंत्रणा कुचकामी बनली असून वाहनधारकांना व पादचाऱ्यांना शिस्त लावण्यात रहदारी पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचे निदर्शनास येत आहे.
रहदारी असलेल्या व वाहतुकीची कोंडी होणाऱ्या यंदे खूंट, राणी चˆम्मा चौक, गोगटे चौक, किल्ला येथील अशोक चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, गोगटे चौक अशा विविध ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र सुविधा असूनदेखील शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी, अपघात अशा घटना घडण्याचे प्रकार होत आहेत. या प्रकारांवर आळा घालण्यास रहदारी खाते अपयशी ठरले असून सिग्नल सुविधा म्हणजे रहदारी विभागाचा वसुली अ•ा बनला आहे.
प्रत्येक सिग्नलमध्ये पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. पण काहीवेळा सिग्नल सुरू असतानाच पादचारी व वाहनधारक ये-जा करीत असतात. विशेषत: यंदे खूंट आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पादचाऱ्यांची संख्या जास्त आहे. याठिकाणी वाहने ये-जा करीत असताना पादचारी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे वाहनधारकांना जोखीम ठरत आहे. सिग्नल सुटल्यानंतर वाहनधारक वेगाने जाण्याच्या प्रयत्नात असतात. पण याच दरम्यान पादचारी ये-जा करीत असल्याने अपघात घडत आहेत.
यंदे खूंट येथे उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण काही वाहनधारक पोलिसांना चकवा देऊन उजवीकडे वळण घेऊन निघून जातात. गोगटे चौकात पोलिसांचा कोणताच वचक नसल्याने वाहनधारक हवी तशी वाहने चालवून अन्य वाहनधारकांना अडचणी निर्माण करीत असतात. डावीकडे वळणारा वाहनधारक उजवीकडच्या टॅकमध्ये थांबतो व सिग्नल सुटल्यानंतर डावीकडे वळतो. यामुळे अन्य वाहनधारकांना अडथळा निर्माण होतो. राणी चˆम्मा चौकात गणपती मंदिर परिसरात वाहनांच्या रांगा लागल्यास कॉलेज रोडकडे येणाऱ्या वाहनधारकांना अडकून पडावे लागते. आरपीडी कॉर्नर, बसवेश्वर चौक, ग्लोब थिएटर, धर्मवीर संभाजी चौक, बॅ. नाथ पै चौक, हॉटेल सन्मानसमोरील चौकात, अनगोळ नाका, उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधील बेम्को कंपनीशेजारी चौकात अशा विविध ठिकाणी सिग्नल सुविधा उपलब्ध केली नाही. यामुळे चौकात वाहनधारकांना मार्ग काढताना अडचण निर्माण होते.
रहदारी पोलीस वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी की वसुलीसाठी?
काहीवेळा याठिकाणी अपघातदेखील घडतात. यापूर्वी या चौकामध्ये काही वाहनधारकांना जीव गमवावा लागला आहे. पण सिग्नल नसलेल्या चौकामध्ये रहदारी पोलीस नियुक्त केले जात नाहीत. सिग्नल असलेल्या चौकात रहदारी पोलीस नियुक्त करण्यात येतात. पण वाहनधारकांना व पादचाऱ्यांना शिस्त लावण्याऐवजी दंड वसुलीच्या कामात व्यस्त असतात. रहदारी कोंडी होणाऱ्या ठिकाणी एकही पोलीस नसतो. पण सिग्नल परिसरात विनाहेल्मेट वाहनधारकांना पकडण्यासाठी चार ते पाच रहदारी पोलीस थांबलेले असतात. यामुळे रहदारी पोलीस वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी की, वसुलीकरिता असा मुद्दा उपस्थित केला जातो. बाजारपेठ व सिग्नल सुविधा नसलेल्या चौकात रहदारी पोलीस अथवा टॅफिक सिग्नलची सुविधा उपलब्ध करून रहदारी नियंत्रण करण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









