वृत्तसंस्था/ दुबई
डंबुला येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात आयसीसी आचारसंहिता नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल लंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगावर आयसीसीने दोन सामन्यांच्या बंदीची तर अफगाणचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज 15 टक्के सामना मानधनाची दंडात्मक कारवाई केली आहे.
24 महिन्यांच्या कालावधीत हसरंगाने पाच डिमेरिट गुण मिळविले असल्याने त्याच्यावर सामना बंदीची कारवाई करण्यात आली. या सामन्यात त्याने पंचांच्या निर्णयाविरुद्ध शेरेबाजी केल्यामुळे त्याला सामना मानधनातील 50 टक्के रकेचा दंड करण्यात आला आणि तो 3 डिमेरिट गुणही मिळाले. या सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात पंच लीन्डन हनिबल यांनी एक फुल टॉस चेंडूला नो बॉल न दिल्याबद्दल हसरंगाने पंचांशी हुज्जत घालत त्यांच्यावर टीका केली.
याच सामन्यात अफगाणच्या गुरबाजने पंचांनी वारंवार सूचना केल्यानंतरही बॅटची ग्रिप बदलून पंचांना अनादर केल्याबद्दल त्याला एक डिमेरिट गुण देण्यात आला. त्याचा हा दुसरा गुण आहे. त्याला 15 टक्के सामना मानधन रकमेचा दंड करण्यात आला.









