Hasan Mushrif : मागील बारा दिवसापासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप तळ्यात- मळ्यात अशा दोलायमान स्थितीत राहिलं होतं. काल (शुक्रवार-14) राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा अखेर निर्णय लागला. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय खातं देण्यात आलंय. यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ईडीच्या भीतीनं सत्तेत गेलो हे डोक्यातून काढून टाका.राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटावर टीका करू नका अशी प्रतिक्रिया आज त्यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला कुठे ही विरोध केला नाही. शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहेत. ते आमचे विठ्ठल आहेत आणि विठ्ठलच राहणार आहेत.ईडीच्या कारवाईत न्यायालयाने मला दिलासा दिला आहे.त्यामुळे ईडीच्या भीतीनं सत्तेत गेलो हे डोक्यातून काढून टाका.राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटावर टीका करू नका,त्यांचं काम त्यांना करू द्या. मला मिळालेल्या दोन्ही खात्यांमध्ये काम करण्यात मला इंटरेस्ट आहे.आज देखील आठवड्याला 20 ते 25 रुग्णांना मुंबईत ऑपरेशनला घेऊन मी जातो.श्रावण बाळ योजना देशात पहिल्यांदा आणली त्यामुळं माझं नाव श्रावणबाळ पडलं.स्वर्गीय खानविलकर साहेब यांच्या आशीर्वादाने सीपीआर रुग्णालय आणखी चकाचक करणार असे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बंटी पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर आणि मी मंत्री असताना जनता दरबार सुरू केला होता. कोरोनानंतर हे बंद झालं, मात्र 1 ऑगस्टनंतर पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेणार आहोत. जिल्ह्यातील नागरीकांचे प्रश्न आम्ही सोडवणार असं ही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार आहे की नाही माहिती नाही.पण कोल्हापुरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत यंदाच्या दिवाळीला थेट पाईपलाईनच्या पाण्याने आंघोळ करणार अशी प्रतिज्ञा मुश्रीफांनी घेतली.
जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस पडला नाही. याविषयी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, गाढवा-गाढवीची लग्न लावा पण पावसासाठी प्रार्थना करा.महापूर आला तर चालेल पण धरणं भरून जाऊ दे. महिन्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नेमून काम सुरू करणार असेही ते म्हणाले








