पक्ष संघटना बळकटीला मिळणार चालना; भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांना शह; मंत्री चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने भाजप कार्यकर्ते नाराज
कृष्णात चौगले कोल्हापूर
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यामुळे जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) ताकद वाढली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी ‘सत्ता जिरवा, पक्ष वाढवा’ या फॉर्म्युल्याचा वापर केल्यास राष्ट्रवादीचा जिल्हाभर विस्तार होण्यास मदत होणार आहे. मुश्रीफ यांना पालकमंत्री पद मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नवचैतन्य निर्माण झाले असले तरी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना डावलल्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर उमटत आहे. या सर्व घडामोडीतून मुश्रीफ यांचे कागल विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक विरोधक समरजीत घाटगे यांना शह मिळाला आहे. विकासकामांचे व्हिजन आणि प्रशासकीय अनुभवाची मोठी शिदोरी पाठीशी असलेले मंत्री मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूरची धुरा आल्यामुळे वर्षानुवर्षे रंगाळलेले अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी कोल्हापूरकरांची माफक अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून आजतागायत मंत्री मुश्रीफ कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. पाच वेळा आमदार, अनेक वर्षे मंत्री पदाचा अनुभव, आणि प्रशासनावर पकड असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी कोल्हापूर जिह्यातील पालकमंत्री पदावर दावा केला होता. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांना पालकमंत्री पद असा निकष लावल्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर अजित पवार गट शिंदे-फडणवीस गटात सहभागी झाल्यामुळे मुश्रीफ यांच्या पालकमंत्री पदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावतंत्रामुळे युती सरकारमध्ये मुश्रीफ यांचे पालकमंत्री पदाचे स्वप्न सत्यात उतरले.
राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान
गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीचे सहकारी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व दिसत असले तरी त्यांनी इतर पक्षांचा टेकू घेतला आहे. करवीर, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, कोल्हापूर उत्तर, दक्षिण या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीमध्ये जिल्हा राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी नूतन पालकमंत्री मुश्रीफ यांना झगडावे लागणार आहे. राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-सेना युतीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गळती सुऊ झाली. राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती पातळीवरील अनेक कार्यकर्ते भाजपवासी झाले. परिणामी 2017 च्या निवडणुकीमध्ये जि.प.मधील संख्याबळात घट होऊन ते 16 वरून 11 पर्यंत खाली आले. त्यावेळी पुरेशा संख्याबळाअभावी काँग्रेस-राष्ट्रवादीला सुऊवातीची तीन वर्षे सत्तेपासून दूर रहावे लागले. त्यामुळे आगामी जि.प. आणि पं.स.च्या निवडणुकीमध्ये संख्याबळ वाढवण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार काय ? कोल्हापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या
कोल्हापूरचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळलेले आहेत. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, खंडपीठ, कोल्हापूर शहराची हद्दवाढ, शहरांतर्गत रस्ते आणि वाहतूकीची कोंडी, पंचगंगा नदी व रंकाळा तलाव प्रदुषण मुक्ती आदी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे नूतन पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा सर्वागिण विकास होणार नाही. लोकसंख्येच्या आधारावर केंद्र सरकारकडून शहर विकासासाठी लागणारा आवश्यक निधी मिळतो. पण कोल्हापूरची हद्दवाढ खुंटल्यामुळे शहराची स्थिती ‘जैसे थे’ आहे. सुरुवातीच्या टप्प्यात शहरालगतीची पाच, सहा गावांना सोबत घेऊन हद्दवाढ करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांची मोट बांधून ग्रामीण भागातील नागरीकांना विश्वासात घेवून हद्दवाढ झाल्यास गावांचा काय फायदा होईल, हे मुश्रीफ यांना पटवून द्यावे लागणार आहेत. कोल्हापूर हे खंडपीठासाठी योग्य ठिकाण आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आदी पश्चिम महाराष्ट्रातील जिह्यात न्याय प्रविष्ठ बाबींची संख्या सर्वाधिक आहे. ही प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी येथील पक्षकारांना कोल्हापुरात खंडपीठ होणे सोईस्कर ठरणार आहे. त्यासाठी मंत्री मुश्रीफ कशा पद्धतीने प्रयत्न करतात याच्यावर प्रश्नांची निर्गतता अवलंबून आहे.
कोल्हापूर-पुणे व्हाया सोलापूर, अमरावती
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिह्याचे पालकमंत्री होते. पण राष्ट्रवादी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुणेच्या पालकमंत्री पदावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला. त्यामुळे पुणे पवार यांना दिले जाणार असेल तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळेल अशी जिह्यातील भाजप कार्यकर्त्यांची धारणा होती. पण अजित पवार यांच्या दबावतंत्रामुळे पुणे बरोबरच कोल्हापूरचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीला म्हणजेच मंत्री मुश्रीफ यांना मिळाले. परिणामी मंत्री चंद्रकांत पाटील यांची वाटचाल कोल्हापूर-पुणे व्हाया सोलापूर, अमरावती अशी झाली आहे.








