आत्तापर्यंत 108 शेतकऱ्यांनी दाखल केली तक्रार
कोल्हापूर / प्रतिनिधी
Hasan Mushrif आम. हसन मुश्रीफसाहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्स रक्कमेपोटी रक्कम रुपये दहा हजार भरले असून सदर रक्कमेच्या पोच पावत्या दिल्या आहेत. परंतु त्यांनी अधिकृतपणे सभासदच करून घेतले नसल्याचे समजते. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, अशी लेखी तक्रार आणखी 67 शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्याकडे दाखल केली आहे.
तक्रार अर्जात पुढे म्हटले आहे असे समजते की सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना हा केवळ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा व कांही एलएलपी कंपन्यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यात अन्य कोणीही सभासद नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी फक्त पैसे जमा करून घेतले आहेत. परंतु सभासदत्व दिलेले नाही.
आ.मुश्रीफ साहेब यांच्या विरोधात यापूर्वीही त्यांनी कारखान्याच्या सभासदत्वाबाबत केलेल्या फसवणुकीबाबत मुरगुड पोलीस ठाणे येथे आमच्यासारख्या काही शेतकऱ्यांच्या कडून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला देखील सदर गुन्हा रजिस्टर नंबर 30/ 2023 मध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी तक्रार या शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे.आत्तापर्यंत 108 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.








