ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे शहरातील पाणीकपातीच्या निर्णयासंदर्भात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील उपस्थित राहणार होते. बैठकीआधी काही वेळ चंद्रकांत पाटील सर्किट हाऊसमध्ये पोहचले. त्यांनी गाडीतून उतरतानाच अजित पवार आलेत की पुन्हा गायब झाले, असा सवाल कार्यकर्त्यांना केला. त्यामुळे कार्यकर्त्यांसह सोबतचे प्रशासकीय अधिकारीही आवाक झाले.
पुण्याच्या आसपास असणाऱ्या धरणांमध्ये जुलै महिन्यांपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी कपात करावी का? यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीसाठी अजित पवार देखील उपस्थित राहणार होते. मात्र, रात्री अजित पवार यांना बैठकीची वेळ बदलण्यात आल्याचे कळवण्यात आले. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते त्यांना टाळता येणं शक्य नव्हतं, त्यामुळे अजित पवार यांनी बैठकीला हजर राहता येणार नसल्याचे मेसेज करून कळविले होते.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात ही बैठक पार पडली. या बैठकीत 15 मे पर्यंत कोणतीही पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 15 मे नंतर पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.








