अभिनेत्रीवर बलात्कार : चांगल्या भूमिका मिळवून देण्याचे प्रलोभन
वृत्तसंस्था/ अमरोहा
हरियाणवी चित्रपट आणि अल्बमच्या जगतातील गाजलेला अभिनेता उत्तम कुमार पुन्हा वादात सापडला आहे. गाजियाबाद पोलिसांनी उत्तम कुमारला अमरोहा येथील एका फार्महाउसमधून अटक केली आहे. एका दलित अभिनेत्रीवर बलात्कार आणि जातिसूचक शब्दांच्या वापराप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उत्तम कुमारने दीर्घकाळापर्यंत शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
2020 साली एका हरियाणवी अल्बमच्या चित्रिकरणादरम्यान उत्तम कुमारला भेटले होते., त्यावेळी त्याने चांगल्या भूमिका मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत सातत्याने शारीरिक संबंध राखले होते. मी अनेकदा त्याला नकार दिला, तरीही त्याने कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी देत अत्याचार केले. याचबरोबर जातिसूचक टिप्पणी करत अपमानित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेने गाजियाबादच्या पोलीस स्थानकात उत्तम कुमार विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचा दावा करत पीडितेने लखनौमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. उत्तम कुमार विरोधात अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली, ज्यात भाग घेत सामाजिक संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली होती.









