वृत्तसंस्था/ राउरकेला (ओडिशा)
हॉकी इंडिया आयोजित येथे झालेल्या तेराव्या उपकनिष्ठांच्या महिलांच्या 2023 च्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद हरियाणा संघाने पटकाविले. या स्पर्धेत विद्यमान विजेत्या हरियाणाने आपले जेतेपद स्वत:कडे राखले. तर या स्पर्धेत झारखंडने उपविजेतेपद मिळविले.
येथे सदर स्पर्धा 11 दिवस खेळविली गेली आणि त्यामध्ये 28 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात हरियाणाने झारखंडचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव करत जेतेपद पटकाविले. या संपूर्ण स्पर्धेत हरियाणाचा संघ अपराजीत राहिला. या अंतिम सामन्यात हरियाणातर्फे भव्याने 2 तर मिनाक्षीने 1 गोल केला. झारखंडतर्फे संगीता कुमारी आणि अंकिता मिन्झ यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. या स्पर्धेमध्ये ओडिशा संघाने तिसरे स्थान मिळविताना उत्तरप्रदेशचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-3 अशा गोल फरकाने पराभव केला.









