वृत्तसंस्था/ भुवनेश्वर (ओदिशा)
येथे सुरू असलेल्या 2012 च्या 18 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत हॉकी या क्रीडा प्रकारात हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवले.
अ गटातील झालेल्या पहिल्या सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी महाराष्ट्राचा 7-2 असा पराभव केला. हरियाणातर्फे पिंकीने 4 गोल तर मनीषा, भातेरी आणि गुर्मेल कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्रातर्फे उत्कर्षा काळे आणि सानिका माने यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. अ गटातील झालेल्या अन्य एका सामन्यात मध्यप्रदेशने ओदिशाला 2-2 असे बरोबरीत रोखले. त्याचप्रमाणे या गटात मिझोराम आणि कर्नाटक यांच्यातील सामनाही 2-2 असा बरोबरीत राहिला.
ब गटातील सामन्यात उत्तर प्रदेशने मणिपूरचा 4-1 असा पराभव केला. उत्तर प्रदेशतर्फे रुचिका उपाध्ये, वंदना पटेल, पितांबरी कुमारी आणि साक्षी शुक्ला यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. ब गटातील दुसऱया एका सामन्यात पंजाबने बिहारचा 12-0 असा एकतर्फी पराभव केला.









