वृत्तसंस्था/ भोपाळ
हॉकी इंडियाच्या येथे सुरू असलेल्या 12 व्या वरिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि तामीळनाडू यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य लढतीत हरियाणाने महाराष्ट्राचा तर तामीळनाडूने कर्नाटकाचा पराभव केला.
या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला. हरियाणातर्फे दीपकने 21 व्या, 50 व्या तसेच 12 व्या मिनिटाला गोल नोंदविले. रवीने 27 व्या तर पंकजने 45 व्या मिनिटाला गोल केले. महाराष्ट्रातर्फे कर्णधार तालेब शहाने 24 व्या आणि 52 व्या मिनिटाला गोल नोंदविले. दुसऱया उपांत्य सामन्यात तामीळनाडूने कर्नाटकाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. तामीळनाडूतर्फे वेस्लेने 44 व्या, सुंदरापंडीने 50 व्या आणि सर्वंनकुमारने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या सामन्यातील सर्व गोल खेळाच्या उत्तरार्धात नोंदविले गेले. आता या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात तिसऱया आणि चौथ्या स्थानासाठी सामना होईल.









