तेलुगू टायटन्स, पाटणा पायरेट्स यांचा पराभव
वृत्तसंस्था/जयपूर
2025 च्या प्रो कबड्डी लीग हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीने तेलुगू टायटन्सचा 33-29 अशा गुणफरकाने पराभव करत या स्पर्धेतील सलग सहावा विजय नोंदविला. दुसऱ्या एका सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सचे आव्हान 43-32 अशा गुणांनी संपुष्टात आणले. दबंग दिल्ली आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील झालेल्या सामन्यात मध्यंतरापर्यंत दबंग दिल्ली तेलुगू टायटन्सच्या तुलनेत पाच गुणांनी पिछाडीवर होता. पण निरज नरवालने आपल्या चढायांवर 9 गुण घेत दबंग दिल्लीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. सौरभ नंदाल आणि फझल अत्राचली यांनी प्रत्येकी 5 गुण नोंदविले. सामना सुरू झाल्यानंतर विजय मलिकने आपल्या चढाईवर तेलुगू टायटन्सचे खाते उघडताना दोन गुण मिळविले.
हरियाणा स्टीलर्स विजयी
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात हरियाणाचा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सचे आव्हान 43-32 अशा 11 गुणांच्या फरकाने पराभव केला. हरियाणा स्टीलर्सतर्फे शिवम पाठारेचा खेळ दर्जेदार झाला. त्याने सर्वाधिक म्हणजे 15 गुण मिळविले. हरदीप आणि जयदीप यांनी प्रत्येकी 5 गुण मिळविले. हरियाणा स्टीलर्सने आतापर्यंत ही स्पर्धा तीनवेळा जिंकली आहे. मध्यंतरापर्यंत हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सवर 21-18 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तराधार्थ पाटणा पायरेट्सने दर्जेदार आणि आक्रमक खेळ केला. आयान आणि सुधाकर यांनी आपल्या जलद चढायांवर तर नवदीप आणि अंकित यांनी बचावफळी भक्कम राखत हरियाणा स्टीलर्सला अधिक आघाडी मिळवू दिली नाही. पण त्यानंतर हरियाणा स्टीलर्सच्या शिवम पाठारेने आपल्या चढाइंंवर संकेत सावंत आणि दीपक तसेच विनय यांना झटपट बाद केल्याने पाटणा पायरेट्सला हा सामना 11 गुणांच्या फरकाने गमवावा लागला.









