वृत्तसंस्था/नवी दिल्ली
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने तेलुगू टायटन्सचा 45-34 अशा 11 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात हरियाणा स्टिलर्स संघातील शिवम पठारे आणि विनय यांची कामगिरी चमकदार झाली. या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर सुरूवातीच्या 20 मिनिटांच्या कालावधीत शिवम पठारेकडे चढाईची सुत्रे हरियाणा स्टिलर्सने सोपविली होती. पठारेने आपल्या चढायांवर जलद गुण वसुल केले. त्यानंतर ही जबाबदारी विनयवर सोपविण्यात आली. विनय आणि शिवम पठारे यांच्या आक्रमक चढायांमुळे तेलुगू टायटन्सच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आले होते.
दरम्यान तेलुगू टायटन्सने प्रतिकारात्मक चढाया केल्या. पण हरियाणा स्टिलर्सच्या बचाव फळीने चोख कामगिरी बजावल्याने तेलुगू टायटन्सला आघाडी मिळू शकली नाही. विनयने आपल्या चढाईवर बोनस गुण मिळवून दिला. 10 मिनिटांच्या कालावधीनंतर तेलुगू टायटन्सच्या कबड्डीपटूंनी अष्टपैलू कामगिरीवर अधिक भर दिला. पहिल्या पाच मिनिटांच्या कालावधीत तेलुगू टायटन्सने हरियाणा स्टिलर्सवर 6-4 अशी दोन गुणांची आघाडी मिळविली आणि त्यानंतर त्यांनी हरियाणा स्टिलर्सचे सर्वगडी बाद करत आपली आघाडी 6 गुणांनी वाढविली. दरम्यान, शिवम पठारेने आपल्या चढायांवर तेलुगू टायटन्सला चोख प्रत्युत्तर देत आपल्या संघाला 10-8 अशी दोन गुणांची बढत मिळवून दिली.









