वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सिक्कीममधील गंगटोक येथे सुरू असलेल्या सहाव्या युवा पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेतील चौथ्या दिवशी हरियाणाचा मुष्टीयोद्धा विशेषने पुरुषांच्या 48 किलो वजन गटात उपांत्य फेरी गाठताना चंदिगडचा विद्यमान आशियाई कनिष्ठ चॅम्पियन कृष पालचा पराभव केला.
48 किलो वजन गटातील झालेल्या या लढतीत विशेषने कृष पालचा 4-3 अशा गुणफरकाने निसटता पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता विशेषचा उपांत्य सामना सेनादलाच्या ऋषीशी होणार आहे. त्याचप्रमाणे 54 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत दिल्लीच्या उमेशकुमारने 2021 च्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियन रोहित शेमोलीचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. उमेशकुमार आणि सेनादलाचा आशिष यांच्यात उपांत्य लढत हाईल. 92 किलो वजन गटात हरियाणाच्या आशियाई कनिष्ठ विजेत्या भरत जूनने आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उत्तराखंडच्या ऋद्धीमन सुब्बाचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. या स्पर्धेत हरियाणाच्या हर्ष नागर, अक्षत, यशवर्धन सिंग, रुपेश इशान कटारिया, विनयकुमार आणि लक्ष राठी यांनी विविध वजनगटातून उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेमध्ये विद्यमान विजेत्या सेनादलाने पुन्हा आपले वर्चस्व यावेळीही राखताना त्यांच्या सर्व म्हणजे 13 मुष्टीयोद्ध्यांनी विविध वजन गटात उपांत्य फेरीत गाठली आहे.









