वृत्तसंस्था / रांची
येथे सुरू असलेल्या 2024-25 च्या राष्ट्रीय महिलांच्या हॉकी लीग स्पर्धेच्या अंतिम टप्प्याला प्रारंभ झाला असून बुधवारी झालेल्या विविध सामन्यात हरियाणा, ओडीशा आणि मध्यप्रदेश संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर शानदार विजय मिळविले.
बुधवारच्या पहिल्या सामन्यात हरियाणाने मणिपूरचा अ गटातील लढतीत 7-1 अशा गोल फरकाने पराभव केला. हरियाणातर्फे सावी आणि किर्ती यांनी प्रत्येकी 2 तर के. शशी, सुप्रिया, किर्ती यांनी प्रत्येकी 1 गोल केला. मणिपूरतर्फे एकमेव गोल दीना देवीने नोंदविला. दुसऱ्या सामन्यामध्ये ओडीशाने बंगालवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. ओडीशातर्फे एकमेव निर्णायक गोल दिपीका बारवाने तिसऱ्याच मिनिटाला नोंदविला. मात्र बंगालला शेवटपर्यंत आपले खाते उघडता न आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या सामन्यामध्ये मध्यप्रदेशने महाराष्ट्राचा 2-0 असा पराभव करुन पूर्ण गुण वसुल केले. मध्यप्रदेशतर्फे भूमिक्षा साहूने चौथ्या मिनिटाला तर कर्णधार सोनिया कुमेरीने 58 व्या मिनिटाला गोल नोंदविले. महाराष्ट्राला या सामन्यात पेनल्टी कॉर्नर्स मिळवूनही त्याचा लाभ घेता आला नाही. मध्यप्रदेशच्या भक्कम बचाव फळीमुळे महाराष्ट्राला आपले खातेही उघडता आले नाही.
या स्पर्धेतील अ गटातील पहिल्या सामन्यात झारखंडने मिझोरामला गोल बरोबरीत रोखले. या स्पर्धेमध्ये हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, मिझोराम, मणिपूर, ओडीशा यांचा समावेश आहे. सामना जिंकणाऱ्या संघाला तीन गुण तर बरोबरीत राहिलेल्या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जात आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीवर राहणारा संघ लीग सामन्यानंतर या इलाईट स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात विजेता म्हणून घोषित करण्यात आले होते. गेल्या वर्षी या स्पर्धेतील पहिला टप्पा घेण्यात आला आणि हरियाणाने 7 सामन्यांतून 16 गुणांसह पहिले स्थान तर झारखंडने दुसरे आणि ओडीशाने तिसरे स्थान मिळविले आहे.









