वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओडिशातील राऊरकेलाच्या बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर सुरु असलेल्या 2023 च्या 13 व्या हॉकी इंडियाच्या उपकनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत हरियाणा, झारखंड, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या संघांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवित उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी कर्नाटकाचा 14-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात हरियाणा संघातर्फे शशी खेसा, निधी यांनी प्रत्येकी 3, खुशी आणि काजल यांनी प्रत्येकी 2, कर्णधार पूजा, अंजनी, भव्या आणि सीमा यांनी प्रत्येकी गोल नोंदविला. दुसऱ्या सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी चंदीगडचा 11-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. झारखंड संघातर्फे स्वीटी डुंगडुंगने तसेच जमुना कुमारी यांनी प्रत्येकी 5 गोल तर अंकिता मिंझने 1 गोल केला. तिसऱ्या सामन्यात हॉकी उत्तरप्रदेशने हॉकी पंजाबचा 6-0 अशा फडशा पाडला. उत्तरप्रदेशतर्फे मधू, रश्मी पटेल, लकी कुमारी, वंदना पटेल, कर्णधार पुर्णिमा यादव आणि रश्मी रेकवार यांनी प्रत्येकी 1 गोल केला. चौथ्या सामन्यामध्ये हॉकी मध्यप्रदेशने दुबळ्या हॉकी आसामवर 34 गोलांचा वर्षाव केला. या सामन्यात मध्यप्रदेश संघातील काजलने 22 गोल करण्याचा विक्रम नोंदविला. सुजाता जयंत, समिक्षा यादव, रुबी राठोड, कर्णधार कृष्णा शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर कनकपाल, एन. रोजीदेवी, सोहा सिद्धकी आणि मिताली शर्मा यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. हॉकी ओडिशाने अन्य एका सामन्यात हॉकी मिझोरामचा 8-1 अशा गोल फरकाने पराभव केला.









