महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार :
वृत्तसंस्था/ कुरुक्षेत्र
हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये दिल्ली-चंदीगड महामार्गावरील वाहतूक रोखून धरत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. एकतेत शक्ती असल्याचे आज सिद्ध झाले आहे. परंतु हा अंतिम विजय नाही. पूर्ण देशात हमीभाव लागू करण्याची मागणी सरकारने मान्य केल्यावरच अंतिम विजय होणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.
आम्ही एक आठवड्यापर्यंत संघर्ष केला आहे. सर्वसामान्य लोक आणि प्रसारमाध्यमांच्या सहकार्यामुळे आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. हरियाणा सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहे. सूर्यफुलाच्या बियांचा हमीभाव वाढविण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री खट्टर यांनी सहमती दर्शविली असल्याची माहिती कुरुक्षेत्राचे जिल्हाधिकारी शांतनू शर्मा यांनी दिली आहे.
हरियाणात सूर्यफुल बीजाकरता हमीभावाच्या मागणीवरून भाजप-जजप सरकार आणि शेतकरी संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या होत्या. कुरुक्षेत्रात शेतकऱ्यांनी सोमवार दुपारपासून जम्मू-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती.
हरियाणात सूर्यफुलाचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रुपयांची मदत केली जाते. आतापर्यंत 29.13 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. हरियाणात सूर्यफुलाच्या बियांना बाजारात 4900 रुपये दर प्रति क्विंटल मिळत आहे, तर सरकारकडून दर क्विंटलमागे 1 हजार रुपये दिले जात आहेत. महाराष्ट्रात याच पिकाला 3550 रुपये, गुजरातमध्ये 3975 रुपये प्रति क्विंटल इतका दर असल्याचा दावा हरियाणा सरकारने केला होता.
6 जून रोजी शेतकरी संघटनांनी महामार्गावरील वाहतूक रोखली होती. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवून वाहतूक पूर्ववत करण्याचे आवाहन शेतकरी संघटनांना केले होते. परंतु शेतकरी संघटनांनी याला नकार दिल्याने पोलिसांना कारवाई करावी लागली होती. यावेळी शेतकरी नेत गुरनाम चढूनी समवेत 150 जणांना अटक करण्यात आली होती. तर 700 शेतकऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते.
शेतकरी नेत्यांना अटक झाल्यावर 7 जून रोजी पूर्ण हरियाणातील रस्तेवाहतूक रोखण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार शेतकऱ्यांनी रस्त्यांवर उतरत वाहतूक रोखली होती. तर त्याचदिवशी शेतकरी नेत्यांना पोलिसांनी कुरुक्षेत्र जिल्हा न्यायालयासमोर हजर केले होते. परंतु त्यांना जामीन घेण्यास नकार दिला होता. यानंतर कुरुक्षेत्रच्या शाहबाद येथे पंचायत आयोजित करण्यात आली होती.









