मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून तपास : मालमत्ता जप्त
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणाच्या पानिपत येथील समालखाचे काँग्रेस आमदार धर्मसिंह छौक्कर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. गुरुग्राम येथील त्यांची मालमत्ता तसेच ऑफिस ईडीने जप्त केले आहे. याचबरोबर 4 आलिशान वाहने, रोख रक्कम अन् दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
ईडीकडून छापे टाकण्यात आल्याची माहिती कळताच धर्मसिंह छौक्कर आणि त्यांचे पुत्र सिकंदर हे भूमिगत झाले आहेत. दोघांचेही मोबाइल स्विच ऑफ आहेत. तर आमदारांच्या समर्थकांनी ईडी कारवाईवरून संताप व्यक्त केला आहे. आमदार छौक्कर यांना हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हु•ा यांचे निकटवर्तीय मानले जाते.

गुरग्राम पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यावर आमदाराच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू झाली होती. गुरुग्राम पोलिसांनी आमदाराशी संबंधित कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला होता. या कंपनीने 1,497 लोकांकडून घर बांधून देण्याचे खोटे आश्वासन देत 360 कोटी रुपये उकळले होते. कंपनीने लोकांना दिलेले आश्वासन न पाळल्याने पोलिसांना कारवाई करावी लागली आहे.
ईडीच्या कारवाईदरम्यान आमदार धर्मसिंह छौक्कर, त्यांचे पुत्र सिकंदर आणि विकास सोबत कंपन्यांचे महत्त्वपूर्ण कर्मचारी अनुपस्थित राहिले. याचबरोबर आतापर्यंत त्यांनी ईडीच्या चौकशील सामोरे जाणे टाळले आहे.









