वृत्तसंस्था/ भोपाळ (मध्यप्रदेश)
येथे झालेल्या 6 व्या युवा महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत विद्यमान विजेत्या हरियाणाने यावेळीही आपले निर्विवाद वर्चस्व राखत 9 पदकांची कमाई करत सांघिक जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी हरियाणाच्या महिला स्पर्धकांनी विविध 8 वजन गटात अंतिम फेरी गाठत सुवर्ण पदकांची कमाई केली. या स्पर्धेमध्ये हरियाणाच्या महिला मुष्टीयोद्ध्यांनी 8 सुवर्ण आणि 1 कांस्य अशी एकूण 9 पदकांसह तसेच 63 गुणांसह सांघिक जेतेपद मिळविले. हरियाणाच्या भावना शर्माने 48 किलो गटात, अनषुने 50 किलो गटात अनुक्रमे उत्तराखंडच्या कामेका के. व उत्तरप्रदेशच्या चंचल चौधरीचा अंतिम लढतीत 5-0 अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. 52 किलो गटात हरियाणाच्या मोहिनीने चंदीगडच्या निधीचा 4-3 अशा गुणफरकाने तर 81 किलोवरील गटात हरियाणाच्या किर्तीने राजस्थानच्या निरजेरा बाबाचा पराभव करत सुवर्णपदक घेतले. हरियाणाच्या प्रियाने 57 किलो गटात, मुस्कानने 75 किलो गटात, प्रांजल यादवने 70 किलो गटात तर तनूने 54 किलो गटात सुवर्णपदके मिळविली. या स्पर्धेत उत्तराखंड आणि दिल्ली यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकाविले. उत्तराखंडने 3 सुवर्ण आणि 1 रौप्यपदकासह 32 गुण घेतले. तर दिल्लीने 3 रौप्य आणि 1 कांस्यपदकासह 20 गुण नोंदविले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हरियाणाची प्रिया ही सर्वोत्तम मुष्टीयोद्धा म्हणून जाहिर करण्यात आली.









