वृत्तसंस्था /राजकोट
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत हरियाणा संघाने उपांत्य सामन्यात तामिळनाडूचा 63 धावांनी पराभव करत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. हरियाणा संघातील फलंदाज हिमांशु राणाने शानदार शतक झळकविले तर अन्शूल कंबोजने 30 धावात 4 गडी बाद केले. या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हरियाणाने 50 षटकात 7 बाद 293 धावा जमविल्या. त्यानंतर तामिळनाडू संघाचा डाव 47.1 षटकात 230 धावात आटोपला. हरियाणाच्या डावामध्ये हिमांशु राणाने 2 षटकार आणि 11 चौकारांसह 118 चेंडूत नाबाद 116 धावा पटकाविल्या. लिस्ट ए क्रिकेटमधील राणाचे हे चौथे शतक आहे. सलामीचा अंकीत कुमार केवळ 12 धावावर बाद झाला. त्यानंतर युवराज सिंगने 65 धावांचे योगदान देताना राणासमवेत तिसऱ्या गड्यासाठी 132 धावांची भागिदारी केली. सुमीत कुमारने 30 चेंडूत 48 धावा जमविल्या. तामिळनाडूतर्फे टी. नटराजनने 3 तर वरुण चक्रवर्ती व साई किशोर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली तामिळनाडू संघाला हरियाणाने 230 धावात रोखले. तामिळनाडू संघातील बाबा इंद्रजीतने 64 तर कर्णधार दिनेश कार्तिकने 31 धावा जमविल्या. बाबा इंद्रजीत व बाबा अपराजीत या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कंबोजने बाबा इंद्रजीतचा त्रिफळा उडविला. हरियाणातर्फे कंबोजने 30 धावात 4 तर राहुल तेवातियाने 50 धावात 2 गडी बाद केले. तामिळनाडूने आतापर्यंत ही स्पर्धा 5 वेळेला जिंकली आहे. 2021-22 हंगामात तामिळनाडूला हिमालचल प्रदेशकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.
संक्षिप्त धावफलक – हरियाणा 50 षटकात 7 बाद 293 (हिमांशु राणा नाबाद 116, सुमीत कुमार 48, युवराज सिंग 65, नटराजन 3-79, चक्रवर्ती 2-67, साई किशोर 2-41), तामिळनाडू 47.1 षटकात सर्वबाद 230 (जगदीशन 30, बाबा इंद्रजीत 64, दिनेश कार्तिक 31, कंबोज 4-30, तेवातिया 2-50).









