कर्नाटक-महाराष्ट्रासह तेलंगणातही एटीएम फोडीचे प्रकार : गॅसकटर सोबत घेऊनच गुन्हे, गेल्या वर्षी तब्बल दीड कोटी लांबविले
बेळगाव : चार दिवसांपूर्वी सांबरा, ता. बेळगाव येथील एसबीआयचे एटीएम फोडून 75 हजार 600 रुपये पळविण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी तीन पथके नियुक्त केली आहेत. पथकातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. प्रत्यक्षात एटीएम फोडणारी टोळी हरियाणातील असल्याची माहिती उघडकीस आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे ने रंग फासून गॅसकटरने एटीएम सेफ डोअर कापून रक्कम पळविण्यात हरियाणातील अनेक टोळ्या कार्यरत आहेत. या टोळीतील गुन्हेगार एक वर्षानंतर कर्नाटकात आले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारांचा महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण आदी राज्यात वावर होता. बिदर पोलिसांनी या टोळीतील तिघा जणांना अटक केली होती. आता एक वर्षानंतर हरियाणातील गुन्हेगार पुन्हा कर्नाटकात आले आहेत.
बिदर पोलिसांनी शाहीद कमलखान (वय 45) रा. नावली, जि. मेवात, अलीम ऊर्फ रिहान अकबरखान (वय 26) रा. भंगो, जि. मेवात, इलियास अब्दुल रेहमान (वय 45) रा. मटेपूर, जि. मल्लवल्ल या तिघा जणांना अटक केली होती. त्यांचे आणखी चौघे साथीदार फरारी होते. या टोळीतील गुन्हेगार केवळ बेळगाव, पुणे, बेंगळूरच नव्हे तर अनेक राज्यात सक्रिय आहेत. गेल्या वर्षी हरियाणातील गुन्हेगारांनी कर्नाटक, महाराष्ट्र व तेलंगणा या तीन राज्यांत 12 एटीएम फोडून 1 कोटी 58 लाख रुपये पळविले होते. पोलिसांनी त्यांच्याजवळून 9 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम, एचआर 26 ईपी 9967 क्रमांकाची क्रेटा कार जप्त केली होती. बिदरचे तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख चन्नबसवाण्णा एस. एल. यांच्या मार्गदर्शनाखाली हरियाणातील गुन्हेगारांना अटक केली होती.
बिदर जिल्ह्यातील हळ्ळीखेड, बसवकल्याण व विजापूर येथे या टोळीने एटीएम फोडले होते. बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी, चिकोडी व चिकोडी तालुक्यातील अंकली, महाराष्ट्रातील उमरगा, ठाणे, तेलंगणा येथे गॅसकटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून मोठी रक्कम पळविण्यात आली होती. या टोळीने तीन राज्यांत बारा ठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते. बेळगाव पोलिसांनीही या त्रिकुटाला पोलीस कोठडीत घेऊन यमकनमर्डी, चिकोडी व अंकली येथील एटीएम फोडल्याप्रकरणी चौकशी केली होती. चिकोडी येथील एसबीआयचे एटीएम फोडून 23 लाख 48 हजार 800 रुपये तर अंकली येथील एटीएम फोडून 14 लाख 52 हजार 500 रुपये पळविण्यात आले होते. यमकनमर्डी येथील एटीएम मशीनमधून 57 हजार 200 रुपये पळविले होते. 8 नोव्हेंबर 2023 रोजी चिकोडीतील घटना घडली होती. फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या पंधरवड्यात बिदर पोलिसांनी या टोळीतील तिघा जणांना अटक केली होती.
मंगळवार दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी बिदर पोलिसांनी इलियास, शाहीद व अलीम या तिघा जणांना अटक केली होती. कारमधून गुन्हे करण्यासाठी फिरताना एटीएम फोडण्यासाठी लागणारे गॅसकटर व इतर अवजारे ते सोबत घेऊनच फिरतात. एखाद्या कपड्याने आपला चेहरा झाकून घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर रंगाचा स्प्रे मारला जातो. त्यानंतर एटीएम फोडण्यात येते. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सांबरा येथील एसबीआयचे एटीएम फोडतानाही गुन्हेगारांनी हीच पद्धत वापरली आहे. बेळगाव येथील घटनेनंतर लगेच शनिवार दि. 1 मार्च रोजी बेंगळूरजवळील होस्कोट येथील सुलीबेले एसबीआयचे एटीएम फोडले आहे. त्यांच्या गुन्ह्याची वेळ मध्यरात्री 2 ते 3.30 हीच आहे. सांबरा येथे 2.30 ते 3.30 या वेळेत एटीएम फोडले होते. सुलीबेले येथे पहाटे 3 वाजता एटीएम फोडून 30 लाख रुपये पळविण्यात आले आहेत.
गुन्हेगार नेहमी ठिकाणे बदलतात
पोलिसांना चकविण्यासाठी या टोळीतील गुन्हेगार नेहमी आपली ठिकाणे बदलत असतात. सांबरा येथील चोरीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथेही एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. याच टोळीतील गुन्हेगारांनी पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पाच ठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्याची पद्धत व सीसीटीव्ही फुटेजवरून हरियाणातील गुन्हेगारच या गुन्ह्यामागे सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे.
वाहनांना सतत बनावट नंबरप्लेट लावून प्रवास
हरियाणातील मेवात जिल्ह्यात एटीएम फोडणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. त्यांच्या तळावर जाऊन त्यांना ताब्यात घेणे पोलीस यंत्रणेसाठी अनेक वेळा कटकटीचे ठरले आहे. एखादे एटीएम फोडल्यानंतर मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली जाते. टोलनाक्यावर वाहनांची तपासणी केली जाते. याची माहिती असल्यामुळेच टोलनाके चुकविण्यासाठी या टोळीतील गुन्हेगार गुगल मॅपच्या साहाय्याने पर्यायी मार्गाने प्रवास करतात. आपल्या वाहनांना सतत बनावट नंबरप्लेट लावून ते प्रवास करीत असतात. या टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकासह विविध राज्यातील पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. अनेक वेळा एटीएम फोडताना त्यांना रंगेहाथ पकडले जाते. तरच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. नहून त्यांच्यापर्यंत पोहोचणे पोलीस यंत्रणेला कठीण जाते.









