सांगरूळ / वार्ताहर
गेली चार दिवस पडणाऱ्या जोरदार पावसामुळे कुंभी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आसून सांगरूळ – कुडित्रे फॅक्टरी रस्त्यावर पाणी आल्याने आज हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे . यामुळे सांगरूळच्या पश्चिम भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे .
सतत पडणाऱ्या पावसामुळे दोन दिवसांपूर्वीच सांगरूळ – कळे मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे . तसेच सांगरूळ – म्हारूळ दरम्यान असलेल्या हरवळ या मोठ्या ओढ्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे .
कसबा बीड – महे दरम्यानच्या पुलावर पाणी आल्यानंतर शिरोली दुमाला आरळे घाणवडे या तुळशी खोऱ्यातील वाहतूक पूर्णपणे सांगरूळ -कुडित्रे फॅक्टरी मार्गावरून कोल्हापूरकडे सुरू होती . या परिसरातील वाहतुकीसाठी सांगरूळ हा एक सोयीचा पर्याय मार्ग होता .पण आज सांगरूळ कुडित्रे फॅक्टरी मार्गावरील पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्यात आला आहे .यामुळे सांगरूळच्या पश्चिम भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे .