वृत्तसंस्था/ बिजिंग (चीन)
2025 च्या बिजिंग आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा टॉप सिडेड आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेता तिरंदाज हरविंदर सिंगने 2 सुवर्णपदकांची कमाई केल्याने भारताने पदक तक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे. यजमान चीन पदक तक्त्यात पहिल्या स्थानावर आहे.
या स्पर्धेत भारताने एकूण 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्यपदकांसह एकूण 9 पदकांची कमाई करत दुसरे स्थान मिळविले. पदक तक्त्यात चीनने आघाडीचे स्थान मिळविताना 10 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई केली आहे.
भारताच्या हरविंदर सिंगने खुल्या मिश्र सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात भावना समवेत सुवर्णपदक मिळविले. हरविंदर सिंगने यानंतर पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात आणखी एक सुवर्णपदक पटकाविले. हरविंदर आणि भावना या जोडीने रिकर्व्ह खुल्या मिश्र सांघिक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत चीनच्या गाओ व गेन यांचा 5-4 (14-8) असा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. पुरुष रिकर्व्ह खूल्या वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात हरविंदर सिंगने थायलंडच्या नेटसिरीचा 7-1 असा पराभव करत सुवर्णपदक घेतले. या स्पर्धेत भारताने आणखी एक सुवर्णपदक महिलांच्या सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात मिळविले. शितल देवी आणि ज्योती यांनी चीनच्या झेंग व झाओ यांचा 148-143 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. पुरुषांच्या खुल्या रिकर्व्ह दुहेरीच्या तिरंदाजी प्रकारात हरविंदर सिंग आणि विवेक चिकरा यांनी रौप्यपदक घेतले. पुरुषांच्या डब्ल्यू वन विभागात भारताच्या नवीन दलाल आणि नुरुद्दीन यांनी कांस्यपदक पटकाविले.









