वार्ताहर/कुद्रेमनी
ढगाळ वातावरण आणि शनिवारी, रविवारी पडलेल्या पावसामुळे कुद्रेमनी गाव परिसरातील शेतकऱ्यांना थंडीची सुगी गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. यंदा पिके चांगली असूनही नुकसानग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा शेकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे.भात, ऊस, रताळी, बटाटा आदी नगदी पिके या भागात मोठ्या प्रमाणात पिकविली जातात. भात, नाचणा पिकांची कापणी व मळणीची कामे सुरू असतानाच पाऊस पडला. पावसाळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रचंड प्रमाणात असलेल्या पाणथळ शिवार भागात पुन्हा पाणी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवार भागात कापून टाकलेली भातपिके भिजली. मळण्यांचे काम अर्धवट राहिले. मळण्या भिजल्या. भात भिजून नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ट्रॅक्टर किंवा बैलगाड्यांनी भाताची मळणी केली जाते. पण जमिनीमधील पाणी व ओलाव्यामुळे जमिनीवर प्लास्टिक तट टाकून त्यावर भाताचे किंवा बडवून भाताची मळणी केली जात आहे.
भाताची आडवं उचलताना भात शेतातच गळून पडत असल्याने नुकसान झाले आहे. माळरानात नाचणा पीक यंदा चांगले पिकले. पण पावसाळी स्थितीमुळे नाचणा कापणी व मळणीची कामे धोक्यात आली आहेत. अनेक साखर कारखान्यांचे मजूर उसमळ्यात उसतोडणीची कामे करीत आहेत. पण पावसाळी वातावरणाने व दोन दिवस पडलेल्या पावसाने उसमळ्यांतून उस वाहतूक करणारी वाहने शेतात अडकून असल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षीसारखे उसाचे वजन खुंटल्याने प्रमाण अधिक असल्यामुळे यंदा उस पिकाचे उत्पादन नुकसानीचे ठरणार असल्याची चर्चा शेतकरीवर्गातून होत आहे. सध्या रताळी पिकाचा दर साधारणपणे मिळत असला तरी पावसामुळे रताळी काढण्याचे काम कठीण होवून बसले आहे. भागात कांही शेतकरी पाण्याच्या सोयीनुसार उन्हाळी रताळी पिकाची लागवड करताना दिसत आहेत. बटाटा पिकाच्या बाबतीत खर्च अधिक, उत्पादन कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने पूर्वीपेक्षा बटाटा लागवडीचे प्रमाण खूप कमी झाले आहे.









