3 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीतील दोघा जणांना शनिवारी हारुगेरी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघेजण मिरज येथील राहणारे आहेत. त्यांच्याजवळून 1 लाख 38 हजार रुपये किमतीच्या 12 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रविचंद्र डी. बी., पोलीस उपनिरीक्षक जी. एस. उप्पार, आर. आर. कंगनोळ्ळी, सी. डी. गंगावती व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. एकूण पाच जणांची ही टोळी असून या टोळीतील दोघा जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी हारुगेरी क्रॉसवर वाहनांची तपासणी करताना एमएच 13, एएन 5310 क्रमांकाची टाटा येस गुड्स वाहन अडवून तपासणी करण्यात आली. या वाहनात चोरलेल्या बॅटऱ्या होत्या. दोघा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पाच जणांनी मिळून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे त्यांना अटक करून 12 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या.
पोलिसांनी 1 लाख 38 हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्यांसह सुमारे 2 लाख रुपये किमतीचे टाटा येस वाहनही जप्त केले आहे. दादू बाबूशहा जातगार (वय 29), इस्माईल बाबूशहा जातगार (वय 27) दोघेही राहणार प्रेमनगर, शास्त्राr चौक, मिरज अशी त्यांची नावे आहेत. उर्वरित तिघा जणांचा शोध घेण्यात येत आहे.









