एपीएमसी व्यापारी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे धाव घेण्याच्या तयारीत
बेळगाव : एपीएमसी सचिवांकडून खासगी भाजी मार्केट व्यापारी संघटनेला नोटीस देऊन पालकमंत्र्यांच्या बैठकीमधील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. मात्र, याकडे व्यापारी संघटनेने दुर्लक्ष केल्याने एपीएमसीमधील व्यापारी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे खासगी भाजी मार्केट व्यापारी संघटना कोणता निर्णय घेणार, हे पहावे लागणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून भाजीपाला बाजारपेठ उभारण्यात आली आहे. गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी व्यापार होत नसल्याने अनेक गाळेधारकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वामध्ये जय किसान भाजी मार्केट व एपीएमसी भाजी मार्केट व्यापाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये खरेदीला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जय किसान भाजी मार्केटकडून यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने एपीएमसी सचिवाकडून जय किसान भाजी मार्केटला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे व्यापारी संघटना कोणता निर्णय घेणार, हे पहावे लागणार आहे.
पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीमध्ये एपीएमसी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना व गाळेधारकांना दिलासा मिळाला होता. मात्र, या निर्णयाची ठोसपणे अंमलबजावणी झाली नसल्याने एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गाळे घेतलेल्या व्यापाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावरून एपीएमसी सचिवांकडून जय किसान भाजी मार्केटला नोटीस बजावण्यात आल्याने जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटना कोणता निर्णय घेणार, याकडे एपीएमसीमधील व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. लाखो रुपये खर्च करून एपीएमसीमध्ये अनेक जणांनी गाळे खरेदी केले होते. मात्र, खासगी मार्केट सुरू झाल्याने येथील व्यापार पूर्णपणे थंडावला आहे. यामुळे लाखो रुपये खर्च करून गाळे घेतलेल्या व्यापाऱ्यांवर कर्जाचा भार वाढला आहे. यामुळेच एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनासह पालकमंत्र्यांकडे धाव घेतली होती. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 13 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये 50 टक्के व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये खरेदीसाठी पाठवून देण्याची सूचना खासगी मार्केट व्यापाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र, यावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. यामुळे एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी पुन्हा प्रशासनाकडे दाद मागण्याची तयारी चालविली आहे.
अंमलबजावणीसाठी सूचना
जय किसान भाजी मार्केट व्यापाऱ्यांना नोटीस बजावून पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचे मन वळवून एपीएमसीमध्ये व्यवहार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
– एपीएमसी सचिव गुरुप्रसाद









