गणेश जगताप व अक्षय शिंदे यांच्यातील लढत बरोबरीत
सांगरूळ / वार्ताहर
सांगरूळ ( ता करवीर) येथील जोतिर्लिंग यात्रा कमिटी व खाडे तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांकाच्या तुल्यबळ लढतीत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांने महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याचे वर १९ व्या मिनिटाला झोळी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला .हर्षवर्धनला दोन लाख इनामासह भैय्या केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले.
प्रथम क्रमांकाची दीड लाख इनाम व सांगरुळ केसरी किताबासाठीची दुसरी लढत उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप व उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्यात झाली. कुस्तीच्या तिसऱ्या मिनिटाला दस्ती खेचत गणेशने अक्षयचा ताबा घेतला पुढच्याच मिनिटाला अक्षयने ही तितक्या चपळाईने सुटका करून घेतली. खडाखडीने कुस्ती सुरू असताना कुस्ती कडेला जाऊन दोन्ही पैलवान आखाड्याच्या बाहेर पडले. यात दोघेही जखमी झाल्याने ही प्रेक्षणीय कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धन सदगीर ( आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे ) विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै बाला रफिक शेख ( हनुमान आखाडा पुणे) यांच्यातील लढतीला हिंदकेसरी दीनानाथसिंह गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम पै संभाजीराव पाटील, बाजीराव खाडे यांचे सह ग्रामपंचायत व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते रात्री ९.३० वाजता प्रारंभ झाला. कुस्तीच्या सातव्या मिनिटालाच दस्ती खेचत बाला रफिक शेखने सदगीरवर ताबा मिळविला. बाला रफिक एक चाक डावाची पकड घेत असतानाच सदगीरने यातून सुटका करून घेतली. पुन्हा खडाखडीने कुस्ती सुरू असताना एकेरी पट काढत सदगीरने बाला रफीक शेखवर ताबा घेतला. त्यातच गदालोट मारण्याचा बालाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. कुस्तीच्या १९ व्या मिनिटाला झोळी डावावर हर्षवर्धन सदगीरने बाला रफिक शेखवर प्रेक्षणीय विजय मिळवला.
सेनादलचा अभिजीत कसोटे (सांगरुळ )यांने पै सचिन पाटील (शाहू आखाडा पारगाव ) याचेवर एकलंगी डावावर विजय मिळविला. अन्य प्रेक्षणीय लढतीत पै.हृदयनाथ पाचाकटे (पाचकटेवाडी ) पै. राजवर्धन पाटील पै. सागर पाटील (पाडळी खुर्द ) पै अमोल कोंडेकर (कुडीत्रे ) पै. विश्वजीत पाटील (कोगे ) पै. नवनाथ गोटम (तांदुळवाडी ) पै. अनुज तोडकर ( वाकरे) पै. महेश हराळे, पै बबलू पाटील, पै. गणेश शिदे (खुपिरे ) यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत विजय मिळवलेत स्थानिक मल्ल पै. केदार खाडे पै. साई सुतार पै. अनुज घुंगुरकर पै. शुभम खाडे पै. धैर्यशील लोंढे पै. आमर खाडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणीय विजय मिळवलेत. याबरोबरच शंभरावर लहान मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या.
या कुस्ती मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. जयंत आसगावकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे,बी एच पाटील, हिंदुराव तोडकर, पै. संभाजीराव पाटील, सुभाष पाटील, पै. रंगराव कळंत्रे , उत्तम पाटील, शिवाजीराव खाडे, कृष्णात चाबूक आदी उपस्थित होते. या कुस्ती मैदानात हिंदकेसरी दीनानाथ सिंह महिला मल्ल विश्रांती पाटील व कुस्ती कोच विकास पाटील यांचा सत्कार करण्यात आला .
अपंग मल्लाचा प्रेक्षणीय विजय
पै .अथर्व पाटील (नंदगाव ) या लहान गटातील एका हाताने अपंग असलेल्या मल्लाने प्रेक्षणीय व चटकदार कुस्ती करत एक चाक डावावर प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट केले. विशेष म्हणजे एक चाक डावासाठी दोन्ही हातातील ताकदीचा वापर करावा लागतो. पण डाव्या हाताने अपंग असूनही अथर्वने प्रतिस्पर्ध्याला मारलेल्या एकचाक डावाला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली .
लाल मातीतली कुस्ती टिकली पाहिजे
लाल मातीतील कुस्ती ही .कुस्ती कलेची शान आणी मान आहे ती टिकली पाहिजे असे सांगत हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी कुस्ती मैदानात आपल्या रांगड्या हिंदी भाषेत केलेल्या शेर शायरीना उपस्थित कुस्ती शौकिनानी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.गंगावेस तालमीत एक चांगला पैलवान म्हणून नावारूपास आलेले माझे शिष्य बाळासाहेब खाडे राजकीय आखाड्यात चांगले काम करत आहेत.पण ते लाल मातीला विसरलेले नाहीत . लाल मातीची सेवा करत आहेत हे अभिमानास्पद आहे असे सांगत दिनानाथ सिंह यांनी बाळासाहेब खाडे यांचे कौतुक केले .
प्रथमच दोन महाराष्ट्र केसरी मध्ये लढत
सांगरुळ व परिसरात अनेक लहान मोठी कुस्ती मैदाने झाली आहेत . महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात सर्वोच्च मानाचा किताब समजला जातो .हा किताब पटकावणाऱ्या दोन महाराष्ट्र केसरी मल्लांत तुळ्यबळ लढत परिसरात प्रथमच या मैदानात झाली.यामुळे कुस्ती शौकीनानी गर्दी केली होती .









