राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची पदकांची लयलूट कायम
क्रीडा प्रतिनिधी / पणजी
वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट कायम राखत महाराष्ट्राने शुक्रवारी तीन पदकांची कमाई केली. यात हर्षद वाडेकरचे सुवर्ण, तृप्ती मानेचे रौप्य आणि अभिषेक निपाणेच्या कांस्य पदकाचा समावेश आहे.
वेटलिफ्टिंगमधील पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात हर्षद वाडेकरने स्नॅचमध्ये 148 किलो तर क्लीन-जर्कमध्ये 187 किलो असे एकूण 335 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. सेनादलच्या जगदीश विश्वकर्माला (333 गुण) रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले. हर्षद आणि जगदीश या दोघांनी स्नॅचमधील आपल्या अखेरच्या प्रयत्नात 150 किलो आणि क्लीन-जर्कमधील अखेरच्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. ओडीशाच्या सुरेश यादवला (321 गुण) कांस्य पदक मिळाले. अभिषेक निपाणेने 81 किलो वजन गटात स्नॅचमध्ये 136 किलो तर क्लीन-जर्कमध्ये 173 किलो असे एकूण 309 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. राजस्थानच्या नतिक जांगिडने (317 किलो) सुवर्ण आणि मध्य प्रदेशच्या वल्लुरी बाबूने (312 किलो) कांस्य पदक मिळवले.
महिलांच्या 71 किलो वजनी गटात तृप्ती मानेने स्नॅचमध्ये 87 किलो तर क्लीन जर्कमध्ये 103 किलो असे एकूण 190 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. पंजाबच्या हरजिंदर कौरने (201 किलो) रौप्य आणि माणिपूरच्या पोतशांगस्बाम देवीने (189 किलो) कांस्यपदक मिळवले.









