वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरु असलेल्या आशियाई खंडिया आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत भारताची ग्राँडमास्टर हर्षा भरतकोटीने सहाव्या फेरीअखेर गुणतक्त्यात 5 गुणासह आघाडीचे स्थान कायम राखले आहे. सहाव्या फेरीतील डावात हर्षाने आपल्या देशाच्या ग्राँडमास्टर आर. प्रग्यानंदला बरोबरीत रोखले.
हर्षा आणि प्रग्यानंद यांच्यातील सहाव्या फेरीतील डाव 33 व्या चालीनंतर बरोबरीत राहिला. तत्पुर्वी हर्षाने या स्पर्धेत सलग 4 सामने जिंकले होते. आता हर्षा 5 गुणासह पहिल्या स्थानावर असून अन्य अकरा बुद्धीबळपटू 4.5 अशा समान गुणासह संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत. यामध्ये टॉपसिडेड प्रग्यनंद, मेंडोका, कार्तिकीयेन मुर्ली, के. चटर्जी, एस. एल. नारायणन, अधिबन, सेतूरामण, ए. चिदंबरम यांचा समावेश आहे. सहाव्या फेरीतील अन्य एका पटावर झालेल्या सामन्यात मेंडोकाने सेतूरामणला बरोबरीत रोखले. नारायणन आणि चिदंबरम याने सहाव्या फेरीतील आपले डाव जिंकताना अनुक्रमे संदीपन चंदा आणि आयुष शर्मा यांचा पराभव केला.
महिलांच्या विभागात भारताच्या महिला ग्राँडमास्टर पी. व्ही. नदीधाने आपल्या देशाच्या प्रियान नुटेकीचा 61 व्या चालीत पराभव करत गुणतक्त्यात सहाव्या फेरीअखेर 5.5 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे.









