स्पर्धेच्या इतिहासात 185 वा गोल, टॉटनहॅमचा वुल्वरहॅम्प्टन वांडरर्सवर 1-0 फरकाने विजय
लंडन / वृत्तसंस्था
हॅरी केनने प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात एकाच क्लबकडून सर्वाधिक गोलांचा विक्रम नोंदवत टॉटनहॅम संघाला वुल्वरहॅम्प्टन वांडरर्स संघाविरुद्ध 1-0 अशा फरकाने विजय मिळवून दिला. इंग्लिश कर्णधार हॅरी केनने टॉटनहॅम स्पर्सतर्फे 185 वा व स्पर्धेतील एकूण 250 वा गोल नोंदवला.
हॅरी केनने 64 व्या मिनिटाला हेडरवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. प्रीमियर लीग स्पर्धेत यजमान संघाचा हा घरच्या मैदानावरील 1 हजारावा गोल ठरला. प्रारंभी गोन्सॅलो ग्य़ुडेसच्या डीप कॉर्नरवर रुबेन नेव्हेसने उत्तम व्हॉली लगावली. पण, हय़ुगो लॉरिसने हे आक्रमण सहज परतावून लावले होते.
इपीएल स्पर्धेत एकाच क्लबतर्फे सर्वाधिक गोल
फुटबॉलपटू / संघ / सामने / गोल
हॅरी केन / टॉटनहॅम / 282 / 185
सर्जिओ ऍग्युरो / मँचेस्टर सिटी / 275 / 184
वेन रुनी / मँचेस्टर युनायटेड / 393 / 183
थिएरी हेन्री / अर्सेनल / 258 / 175
ऍलन शियरर / न्यू कॅसल / 303 / 148
मँचेस्टर सिटीची न्यू कॅसल युनायटेडविरुद्ध रोमांचक बरोबरी

टायने (युके) ः मँचेस्टर सिटीने 2 गोलची पिछाडी भरुन काढत न्यू कॅसल युनायटेडविरुद्ध प्रीमियर लीग साखळी सामन्यात 3-3 अशी रोमांचक बरोबरी प्राप्त केली. न्यू कॅसलमध्ये सेंट जेम्स पार्कवर झालेल्या या लढतीत मँचेस्टर सिटीचा संघ पहिल्या सत्राअखेर 1-2 फरकाने पिछाडीवर होता. मात्र, दुसऱया सत्रात दमदार खेळ साकारत त्यांनी रोमांचक बरोबरी मिळवली.
न्यू कॅसलतर्फे मिग्युल ऍल्मिरॉनने 28 व्या मिनिटाला, कॅलम विल्सनने 39 व्या तर केरॅन ट्रिपियरने 54 व्या मिनिटाला गोल केले. मँचेस्टर सिटीतर्फे इकेने 5 व्या मिनिटाला, एरलिंगने 61 व्या तर बर्नांडो सिल्व्हाने 64 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला.









