वृत्तसंस्था /लाहोर
पाकचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफचा मध्यवर्ती करार पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) संपुष्टात आणला आहे. सदर घोषणा पीसीबीच्या प्रवक्त्याने केली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया बरोबरच्या कासोटी मालिकेतून हॅरिस रौफने माघार घेतल्याने पीसीबीने त्याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई केली आहे. 30 जून 2024 पर्यंत होणाऱ्या कोणत्याही विदेशी लिग क्रिकेट स्पर्धेत हॅरिस रौफला खेळण्यास पीसीबीने मनाई केली आहे. पाक क्रिकेट संघाने अलिकडेच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज रौफने आपला नकार कळविला. या कारणास्तव पीसीबीने रौफला दंडही केला आहे. हॅरिस रौफ बरोबर पीसीबीने 1 डिसेंबर 2023 रोजी मध्यवर्ती करार केला होता. या करारानुसार हॅरिस रौफचा ब श्रेणीत समावेश करण्यात आला होता आणि त्याला मासिक वेतन सुमारे 4.6 दशलक्ष रुपये मिळत होते. याशिवाय त्याला सामना मानधन, बोनस आणि इतर भत्ता अशी रक्कम दिली जात होती. पाक क्रिकेट संघाने 18 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात उभय संघात 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळविली गेली होती. या कसोटी मालिकेला ऑस्ट्रेलियाने पाकचा 3-0 असा व्हाईटवॉश केला होता.









