तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी प्रारंभ : स्मृती मानधनाचीही फटकेबाजी
वृत्तसंस्था/ मिरपूर
येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाने यजमान बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम गोलंदाजी करताना बांगलादेशला 114 धावांत रोखले. यानंतर भारतीय संघाने विजयी लक्ष्य 16.2 षटकांत तीन गडयांच्या मोबदल्यात पूर्ण केले. उभय संघातील दुसरा टी-20 सामना दि. 11 रोजी मिरपूर येथे खेळवला जाईल. 35 चेंडूत नाबाद 54 धावांची खेळी साकारणाऱ्या हरमनप्रीत कौरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशच्या महिला संघाची सुरुवात खराब झाली. पाचव्या षटकात 27 धावांवर बांगलादेशला पहिला धक्का बसला. शमीमा सुलतान 13 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 धावा करून बाद झाली. यानंतर 9 व्या षटकात शाथी राणी 26 चेंडूंत चार चौकारांसह 22 धावा करून बाद झाली. शोभनाने 33 चेंडूत 23 धावा केल्या. कर्णधार निगार सुलतानाला फारशी चमक दाखवता आली नाही. तिने सात चेंडूत दोन धावा केल्या. यानंतर शोरणा अख्तरने 28 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा करत संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. रितू मोनीने 13 चेंडूत 11 धावा करत तिला चांगली साथ दिली.
हरमनप्रीतचे नाबाद अर्धशतक
विजयासाठीच्या 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शेफाली वर्माला भोपळाही फोडता आली नाही. जेमिम रॉड्रिग्जही स्वस्तात बाद झाली. तिने 2 चौकारासह 11 धावा फटकावल्या. 2 बाद 21 अशी बिकट स्थितीतून स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौरने तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी साकारत विजयाचा पाया रचला. स्मृतीने 34 चेंडूत 5 चौकारांसह 38 धावा केल्या. 38 धावांवर स्मृतीला सुलताना खातूनने बाद केले. यानंतर हरमनप्रीत व यास्तिका भाटिने 16.2 षटकांत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. हरमनप्रीतने 35 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 54 धावा करत विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. यास्तिकाने नाबाद 9 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकांत 5 बाद 114 (शाथी राणी 22, शामिमा सुलताना 17, शोभना 23, शोरना अख्तर नाबाद 28, रितू मोनी 11, पूजा वस्त्राकार, शेफाली वर्मा, मिन्नू मनी प्रत्येकी एक बळी).
भारत 16.2 षटकांत 3 बाद 118 (शेफाली वर्मा 0, जेमिमा 11, स्मृती मानधना 5 चौकारासह 38, हरमनप्रीत कौर 35 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 54, यास्तिका भाटिया नाबाद 9, सुलताना खातून दोन बळी, मारुफा अख्तर एक बळी).









