वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाने आगामी आशिया कपसाठी 18 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या हरमनप्रीत सिंगकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. ही स्पर्धा 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील नुकत्याच विकसित झालेल्या राजगीर हॉकी स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्पर्धेत भारताला जपान, चीन आणि कझाकस्तानसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत हॉकी आशिया कपमध्ये 29 ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध, त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी जपान आणि 1 सप्टेंबर रोजी कझाकस्तानविरुद्ध मोहीम सुरु करेल.
कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांच्याकडे गोलकीपरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गत वर्षी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर श्रीजेशने निवृत्तीची घोषणा केली. यानंतर पाठक आणि करकेरा या युवा खेळाडूंवर आगामी काळात भारताची भिस्त असेल. सुमित, जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास आणि जुगराज सिंग यांना डिफेन्स लाइनमध्ये स्थान देण्यात आले आहे. मनप्रीत सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांना मिडफिल्डर्समध्ये स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, फॉरवर्ड आक्रमणाचे नेतृत्व मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा आणि दिलप्रीत सिंग करतील, जे कोणत्याही विरोधी बचावफळीला अडचणीत आणण्याची क्षमता बाळगतात.
सलामीला भारत-चीन आमनेसामने
भारतीय संघाचा पहिला सामना चीनविरुद्ध असेल. हा सामना 29 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. त्यानंतर भारतीय संघ जपान आणि कझाकस्तानविरुद्ध साखळी सामने खेळेल. त्यानंतर सुपर-4 फेरीचे सामने खेळवले जातील. दरम्यान, या स्पर्धेतून पाकिस्तान आणि ओमानने आपले नाव मागे घेतले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि कझाकस्तानला संधी देण्यात आली आहे.
आशिया चषकासाठी भारतीय हॉकी संघ –
गोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा. बचावपटू : सुमित, जरमनप्रीत सिंग, संजय, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग. मिडफिल्डर : राजिंदर सिंग, राजकुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद. फॉरवर्ड : मनदीप सिंग, शैलेंद्र लाक्रा, अभिषेक, सुखजीत सिंग, दिलप्रीत सिंग.
आशिया कप आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विश्वचषक पात्रतेसाठी ही स्पर्धा महत्वपूर्ण असल्याने आम्हाला या स्पर्धेत शानदार कामगिरी करावी लागणार आहे. आमच्याकडे प्रत्येक विभागात (बचाव, मध्यक्षेत्र आणि आक्रमण) अनुभवी खेळाडू आहेत आणि ही सामूहिक ताकद मला सर्वात जास्त उत्साहित करते. या स्पर्धेतही या ताकदीच्या जोरावर आम्ही जेतेपद मिळवू.
क्रेग फुल्टन, भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक









