वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या आगामी होणाऱया पुरुषांच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून हरमनप्रीत सिंगकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचे उपकर्णधारपद मनप्रीत सिंगकडे देण्यात आले आहे.
2022 च्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत भारताचे सामने स्पेन आणि न्यूझीलंडविरुद्ध भुवनेश्वरमध्ये खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी मंगळवारी 22 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. या स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना न्यूझीलंडबरोबर 28 ऑक्टोबरला तर त्यानंतर भारताचा दुसरा सामना स्पेनबरोबर 30 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील परतीचा सामना 4 नोव्हेंबरला त्याचप्रमाणे स्पेनबरोबरचा परतीचा सामना 6 नोव्हेंबरला खेळविला जाईल. भारतीय हॉकी संघातील हॉकीपटूंमधील नेतृत्वाच्या क्षमतेचा विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून या स्पर्धेसाठी हरमनप्रीत सिंगकडे नेतृत्व सोपविण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी केले. निवडण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघामध्ये काही नव्या चेहऱयांना संधी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची यापूर्वी झालेल्या हॉकी 5 एस स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱया भारतीय हॉकी संघातील मोहमद राहील मुसेन तसेच जकार्तामध्ये झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण करणाऱया एस. कार्ती यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वरमध्ये या आठवडय़ाअखेर सुरू होणाऱया 2022 च्या प्रो लिग हॉकी स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱयांसाठी हॉकी इंडियाने अनुभवी खेळाडूंचा संघ निवडला आहे. या स्पर्धेतील सर्व सामने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळविले जातील. तसेच येत्या जानेवारीमध्ये होणाऱया पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद ओरिसाला मिळाले असून या स्पर्धेतील सामने कलिंगा स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत.
भारतीय हॉकी संघ- गोलरक्षक- कृष्णन बहाद्दूर पाठक, पी. आर. श्रीजेश, बचावफळी- जर्मनप्रित सिंग, सुरिंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, मनदीप मोर, निलम संजीब झेस, मध्यफळी-मनप्रीत सिंग (उपकर्णधार), हार्दिक सिंग, एम. रविचंद्र सिंग, समशेर सिंग, राजकुमार पाल, मोहमद राहील मुसेन, आघाडीफळी- एस. कार्ती, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक, सुखजित सिंग.









