बिहारमधील सत्तारुढ पक्षाची नवी टीम जाहीर : त्यागी प्रवक्तेपदी
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारमधील सत्तारुढ पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वत:च्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. संजदच्या 98 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत 7 सचिव आणि 22 महासचिव नियुक्त करण्यात आले आहेत. के.सी. त्यागी यांना विशेष सल्लागार तसेच पक्षाचे मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले आहे. तर आलोक कुमार सुमन यांना पक्षाचे खजिनदार करण्यात आले आहे. परंतु राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांना मात्र पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. संजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांच्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आहे. यातून पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह असले तरीही पक्षाचे सर्वोच्च नेते नितीश कुमार हेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीश कुमार हे पक्षाध्यक्ष असताना हरिवंश यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले होते. परंतु हरिवंश यांची राज्यसभेतील भूमिका पाहता पक्षाने त्यांच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून हरिवंश यांनी नितीश कुमार यांची नाराजी ओढवून घेतली होती. यानंतर पक्षामधून हरिवंश यांच्या विरोधात आवाज उठू लागला होता. संजदच्या कार्यकारिणीत हरिवंश यांना वगळून सर्व खासदारांना स्थान मिळाले आहे. संजदचे सर्व 16 लोकसभा खासदार अन् राज्यसभेच्या 5 पैकी 4 खासदारांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. संजदचे अनेक नेते आता राष्ट्रीय कार्यकारिणीत हरिवंश यांचा समावेश नसण्यामागे ते घटनात्मक पदावर असल्याचे कारण देत आहेत.
पक्षाची राष्ट्रीय विस्ताराची योजना
संजदच्या नव्या कार्यकारिणीत बिहारलाच प्राधान्य मिळाले आहे. नव्या टीममध्ये जातीय समीकरणांसोबत क्षेत्रीय संतुलनही विचारात घेण्यात आले आहे. नितीश कुमार हे उत्तरप्रदेशातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने उत्तरप्रदेशातील माजी खासदार धनंजय सिंह आणि प्रदेशाध्यक्ष सत्येंद्र पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले आहे. धनंजय सिंह यांना राष्ट्रीय महासचिव पद देण्यात आले. मणिपूरचे आमदार हाजी अब्दुल नासिर आणि नागालँडचे आमदार ज्वेंगा सेब यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले. पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रातील संजद प्रदेशाध्यक्षांनाही नव्या टीममध्ये सामील करण्यात आले आहे.









