बेरोजगार तरुणांच्या आंदोलनादरम्यान घटना
देहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांची प्रकृती शुक्रवारी खालावली. बेरोजगार तरुणांच्या निदर्शनात सहभागी होण्यासाठी ते देहराडूनला पोहोचले असताना ही घटना घडली. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तराखंड लोकसेवा आयोगाच्या (युकेपीएससी)भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात शहरातील घंटाघर चौकाजवळ आंदोलन करणाऱया तरुणांवर देहराडून पोलिसांनी लाठीचार्ज केला. काँग्रेसनेही या प्रकारावर निषेध नोंदवला आहे. याचदरम्यान माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती खालावली. अनेक भरती परीक्षांमधील कथित अयोग्य पद्धतींचा निषेध करण्यासाठी गांधी पार्क येथे उमेदवारांचा मोठा जमाव जमल्यानंतर विद्यार्थी घंटाघर चौकाकडे जाऊ लागताच स्थानिक प्रशासनाने गर्दी हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला. काही वेळातच पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार संघर्ष झाला.
विद्यार्थ्यांच्या या निदर्शनाबाबत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करत शांतता राखण्यास सांगितले. आमचे सरकार राज्यातील तरुणांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सतर्क आहे. आम्ही कोणताही नोकरभरती घोटाळा दडपलेला नाही किंवा लपविला नाही. आमच्या सरकारने भरती परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की भविष्यातील सर्व भरती योग्य पद्धतीने होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, उत्तराखंडमध्ये तरुणांचे आंदोलन रोखण्यासाठी डेहराडून जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी परेड ग्राउंडच्या 300 मीटरच्या परिघात कलम 144 लागू करून प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. नोकरभरती परीक्षेतील कथित घोटाळय़ाच्या विरोधात बेरोजगार तरुणांकडून सुरू असलेली निदर्शने पाहता कलम 144 लागू करण्यात आले आहे.









