साहिबजादा फरहानची मात्र इशाऱ्यावर सुटका
वृत्तसंस्था/ दुबई
गेल्या रविवारी भारताविऊद्धच्या आशिया कप सुपर 4 सामन्यादरम्यान असभ्य आणि आक्रमक वर्तनासाठी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला शुक्रवारी त्याच्या सामन्याच्या शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला. त्याच सामन्यात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याच्या ओपन एअर गन शॉट सेलिब्रेशनसाठी त्याचा सहकारी साहिबजादा फरहानची मात्र कोणताही आर्थिक दंड न ठोठावता इशाऱ्यावर सुटका झाली आहे.
सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी शुक्रवारी दुपारी सुनावणी पूर्ण केली. आक्रमक वर्तनासाठी हारिस रौफला त्याच्या सामन्याच्या शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि फरहानला इशारा देऊन सोडण्यात आले आहे, असे स्पर्धेतील एका सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. त्यापूर्वी, भारताविऊद्धच्या सामन्यात कथित प्रक्षोभक कृती केल्याप्रकरणी आयसीसीच्या सुनावणीदरम्यान रौफ आणि फरहान यांनी ते दोषी नसल्याचे सांगितले होते, असे स्पर्धेतील सूत्रांनी सांगितले.
येथील पाकिस्तान संघाच्या हॉटेलमध्ये सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी सुनावणी घेतली. दोन्ही खेळाडूंनी उत्तरे लेखी स्वरूपात दिलेली असली, तरी ते व्यक्तिश: उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत संघ व्यवस्थापक नविद अक्रम चीमा देखील होते. बुधवारी बीसीसीआयने औपचारिक तक्रारीत या दोघांवर चिथावणीखोर हावभाव केल्याचा आरोप केला होता. रविवारी आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही शेजारी एकमेकांशी भिडणार आहेत. रौफने विमाने पडल्याचे हावभाव करून स्टँडमधील भारतीय चाहत्यांची थट्टा केली होती, तर सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर फरहानने केलेला आनंदोत्सवही भारतीय संघाला आक्षेपार्ह वाटला होता.









