दोन्ही पुलांचे काम केवळ दळणवळणापुरतेच, वर्षातील चार–सहा दिवस वाहतूक ठप्प होणार निश्चित!
सांगली / शिवराज काटकर :
सांगली शहराला जोडणारे बायपास आणि हरिपूर–संगम पूल हे पुराच्या काळात निष्प्रभ ठरत आहेत. हे दोन्ही पूल उंच असूनही त्यांना जोडणारे दोन्ही बाजूचे रस्ते दरवर्षी पुराच्या पाण्याखाली जातात, त्यामुळे वाहतूक ठप्प होते. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या पुलांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मते हे पूल बारमाही दळणवळणासाठी उपयुक्त असून, ते धोका व इशारा पातळीपर्यंत वापरणे शक्य आहे. मात्र वर्षातील चार ते सहा दिवस पूरामुळे वाहतूक बंद होणार, हे गृहीत धरावेच लागते. उर्वरित काळात या पुलांचा उपयोग महत्त्वाचा असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.
या समस्येचा विचार करताना केवळ या दोन पुलांपुरते हे प्रकरण मर्यादित नाही. जर पुलांची उंची अधिक करायची असेल तर त्याचा परिणाम परिसरातील शेतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानावर आणि संलग्न रस्त्यांवर होतो. बायपास रस्त्याची उंची १५ फूटांनी वाढवली तर शिवशंभो चौक, इदगाह चौक, बुधगाव आणि कर्नाळकडे जाणाऱ्या रस्त्यांचे पातळीही तितक्याच प्रमाणात वाढवावी लागेल. यामुळे संपूर्ण भागातील नागरिक, शेतकरी व वाहनधारक यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या व्यापक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांनी स्पष्ट केले.
- मिरजकर यांचे स्पष्टीकरण
‘तरुण भारत संवाद’शी बोलताना मिरजकर म्हणाले की, हरिपूर ते कोथळी आणि सांगली बायपास पूल यांना काही नैसर्गिक व भौगोलिक मर्यादा आहेत. हे पूल केवळ दळणवळणासाठी बांधलेले आहेत. सांगलीची इशारा आणि धोका पातळी लक्षात घेऊन यांचे नियोजन करण्यात आले आहे. बायपास पूल 2005 च्या महापुराच्या आठ वर्षे आधीच बांधलेला असून तो 47 फूट पाण्यापर्यंत वापरात राहतो. मात्र, पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची उंची वाढवणे सहज शक्य नाही. विशेषतः इदगाह ते शिवशंभो चौक या सुमारे एक किलोमीटर लांब रस्त्याची उंची १५ फूटांनी वाढवावी लागेल, त्यासोबत जुना बुधगाव रोड, शिवशंभो चौक आदी रस्त्यांचीही पातळी वाढवावी लागेल, जे अधिक अडचणीचे ठरू शकते.
जर हे जोडरस्ते उंच न केल्यास, मध्ये असलेल्या रस्त्यांची ये-जा थांबू शकते किंवा ती अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशाच प्रकारची मर्यादा सांगलीवाडीतील राष्ट्रीय महामार्गालाही आहे. त्यामुळे पुराच्या वेळी त्या रस्त्यावरही पाणी साचते.
- हरिपूर–कोथळी रस्ताही अडचणीचा
हरिपूर ते कोथळी रस्ता, विशेषतः कोथळीच्या बाजूला, पूर्वीच सात–आठ फूट उंचावलेला आहे. जर अधिक उंची वाढवली, तर शेजारच्या शेतकऱ्यांना मोठा त्रास होऊ शकतो. कारण या भागात पाणी साचले तर त्याचा निचरा होणे कठीण आहे. त्यामुळे येथेही उंची वाढवण्याला मर्यादा आहेत.
- चार दिवस वाहतूक ठप्प होणे वाजवी की वर्षभराचा रस्ता महत्त्वाचा?
या पूल व रस्त्यांचे मूल्यमापन करताना ‘वर्षातील चार–पाच दिवस पूरामुळे वाहतूक बंद होते’ या मुद्द्यापेक्षा ‘उर्वरित वर्षभर दळणवळण सुरळीत राहते’ हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. स्थानिक नागरिक याची जाणीव ठेवून या समस्या स्वीकारून पुढे जाणे गरजेचे असल्याचे मिरजकर यांनी सांगितले.








