तिरुपती देवस्थानचा प्रवास होणार आरामदायी
बेळगाव : तिरुपती-कोल्हापूर रेल्वेप्रवास यापुढे आरामदायी होणार आहे. हरिप्रिया एक्स्प्रेसला यापुढे एलएचबी कोच जोडले जाणार असल्याने वेंकटेश्वराचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. तिरुपती येथून 24 जानेवारीपासून तर कोल्हापूर येथून 27 जानेवारीपासून हे नवे कोच जोडले जाणार आहेत. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसला नेहमीच बुकिंग असते. त्यामुळे या एक्स्प्रेसला एलएचबी कोच जोडण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. लांबपल्ल्याची गाडी असूनही तिला जुनेच डबे जोडण्यात आले होते. परंतु, आता नवीन एलएचबी डबे जोडले असल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने कळविली आहे.









