दक्षिण सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवशी ह.भ.प. संजय पाटील महाराज यांनी आपल्या भावपूर्ण कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, “हरिनाम सप्ताह ही वारकरी संप्रदायाची परंपरा जपत सामाजिक ऐक्य आणि आध्यात्मिक भक्ती वृद्धिंगत करतो.” आलेगावसारख्या लहानशा गावात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे.
या सप्ताहामध्ये गावातील सर्व जाती-धर्मातील भाविक सहभागी होत असून, मागील चार दिवसांपासून ते सेवा कार्यात स्वतःहून सहभागी होत आहेत. दररोज कीर्तनानंतर महाप्रसाद सेवा भाविक भक्तांच्या स्वयंस्फूर्त योगदानाने पार पडत आहे.
हरिनाम सप्ताह २४ जुलैपर्यंत चालणार असून, पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या भक्तिसंमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत सावता माळी देवस्थान कमिटी व समस्त आलेगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.








