वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती केली. 1983 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी प्रीती सुदन या माजी केंद्रीय आरोग्य सचिव आहेत. गुरुवार, 1 ऑगस्ट रोजी त्या पदभार स्विकारतील. प्रीती सुदन ह्या आंध्रप्रदेश केडरच्या अधिकारी असून त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिव म्हणून काम केले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत मोहिमेतही त्यांचे मोठे योगदान आहे. याशिवाय नॅशनल मेडिकल कमिशन, अलाईड हेल्थ प्रोफेशनल कमिशन आणि ई-सिगारेटवर बंदी घालण्याचे श्रेयही त्यांना जाते. तंबाखू नियंत्रणावरील फ्रेमवर्क कन्व्हेन्शनसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वतंत्र समितीच्या सदस्या म्हणूनही प्रीती सुदन यांनी काम केले आहे. याव्यतिरिक्त, जागतिक बँकेसोबत सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात एम. फिल आणि सामाजिक धोरण व नियोजन’मध्ये एमएससी पदवी प्राप्त केली आहे.
मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती
मनोज सोनी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर सुदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोनी यांनी अलिकडेच वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर सामाजिक आणि धार्मिक कार्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तथापि, पूजा खेडकरच्या नियुक्तीसंदर्भात निर्माण झालेल्या वादामुळे त्यांनी पद सोडल्याची चर्चा आहे. युपीएससीशी संबंधित वादांमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी केला होता.