प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवारी पंढरपूर येथे कार्तिक एकादशी सोहळा संपन्न होत आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यावषीची आषाढी कार्तिक वारी लाखो हरिभक्तांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर आता कार्तिक वारीसाठी महाराष्ट्र-कर्नाटकातून हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. वडगाव, बेळगाव येथील श्री ज्ञानेश्वर मंदिर येथून बुधवारी सकाळी कार्तिक वारीसाठी वडगाव परिसरातील हरिभक्त रवाना झाले.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांची आषाढी आणि कार्तिक वारी चुकली होती. त्यामुळे सर्वांनाच यावषीच्या वारीला जाण्याचे वेध लागले होते. यावषी आषाढीबरोबरच कार्तिक वारीलाही सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे मोठय़ा उत्साहात हरिभक्त पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी रवाना होत आहेत.
वडगाव परिसरातील हरिभक्त बुधवारी सकाळी पंढरपूरकडे रवाना झाले. पंढरपूर वारीला निघण्यापूर्वी ज्ञानेश्वर मंदिरात पूजा, आरती करण्यात आली. ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टचे जोतिबा हलगेकर, गंगाराम देसूरकर, संतोष पाटील, महादेव चंदगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त पंढरपूरकडे रवाना झाले. शनिवारी द्वादशी महाप्रसादानंतर हे सर्व भक्त पंढरपूरहून बेळगावला परतणार आहेत.









