भगवद्गीतेवर आधारित प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सहभागी होणार : श्री राधा गोकुलानंद मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्यावतीने 27 वी हरेकृष्ण रथ यात्रा शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू होणार आहे. या रथयात्रेत देश–विदेशातून आलेले हजारो भक्तगण सहभागी होत आहेत. बेळगाव इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज, मूळचे मॉरिशसचे असलेले चंद्रमौली स्वामी महाराज व देश विदेशातून आलेल्या इतर ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुऊवात होईल.
रथयात्रा ध. संभाजी चौक,
कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, शनिवार खुट, गणपत गल्ली, माऊती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली मार्गे रेल्वे ओव्हर ब्रिजवऊन कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडेबाजार, शहापूर, नाथ पै सर्कल, बीएमके आयुर्वेदिक
कॉलेज रोड, गोवावेस मार्गे
इस्कॉनच्या मागे असलेल्या मैदानावर संध्याकाळी 6.30 वा. पोहोचेल. तिथे कीर्तन, ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने आणि सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या रथयात्रेमध्ये सजवलेल्या बैलजोड्या आणि बैलगाड्या भाग घेणार असून भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दर्शवणारे चित्ररथ सहभागी होणार आहेत. रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी होणार असून भाविकांना पाणी, सरबत आणि फळांचे वाटप केले जाणार आहे. बेळगाव जिल्हा महानगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय रथयात्रा मार्गावर व मंदिराजवळ करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून रथयात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य देण्यात आले आहे. रथयात्रेच्या संपूर्ण मार्गावर अतिशय सुंदर अशा रांगोळ्या घातल्या जाणार आहेत. श्री राधा गोकुलानंद मंदिराच्या पाठीमागील बाजूस भव्य असे मंडप उभारण्यात आले असून तेथे भगवद् गीता प्रदर्शन, स्लाईड शो, मेडिटेशन पार्क, गो सेवा स्टॉल, अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन, युवकांना मार्गदर्शन करणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी दोन्ही दिवस भजन, कीर्तन याचबरोबर ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने, नाट्यालिला आदी कार्यक्रम होणार आहेत. मंदिरास भेट देणाऱ्या सर्वांसाठी दोन्ही दिवस रात्री महाप्रसादाची व्यवस्था केली आहे.
रविवारचे कार्यक्रम
रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 04.30 ते 05.30 पर्यंत नरसिंह यज्ञ, ज्यामध्ये अनेक भक्त सहभागी होतात. 06.30 ते 10 वा. पर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, नाट्यालिला आणि सर्वांसाठी महाप्रसाद. वरील सर्व कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे. मंदिर प्रशासन आणि रथयात्रा समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण भट्टड यांनी विनंती केली आहे की, मंदिराकडे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी आपली वाहने (दुचाकी व चार चाकी) मंदिराबाहेरील मुख्य मार्गावरच पार्क करून आत यावे.









