वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय हॉकी संघातील मध्यफळीत खेळणारा हार्दिक सिंग याला स्नायू दुखापत झाल्याने तो सध्या ओडिशामध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत खेळू शकणार नाही. हार्दिक सिंगच्या दुखापतीमुळे भारतीय हॉकी संघाला मोठा दणका बसला आहे.
विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. भारताने या स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात स्पेनचा 2-0 असा एकतर्फी पराभव करून आपल्या मोहिमेला प्रारंभ केला होता. पण रविवारी झालेल्या दुसऱया सामन्यात इंग्लंडने भारताला गोलशून्य बरोबरीत रोखले. या दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिक सिंगची कामगिरी दर्जेदार झाली होती. सदर दुखापत गंभीर असल्यास हार्दिकला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. दरम्यान, भारतीय हॉकी संघामध्ये हार्दिक सिंगच्या जागी आता राजकुमार पालला बदली खेळाडू म्हणून संधी मिळणार असल्याचे समजते. हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघामध्ये राजकुमार पाल आणि बचावफळीत खेळणाऱया जुगराज सिंग हे राखीव खेळाडू म्हणून जाहीर केले होते.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नियमानुसार निवडण्यात आलेल्या अठरा खेळाडूंपैकी एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी राखीव खेळाडूची निवड करण्याची तरतूद केली आहे. तथापि, जखमी झालेल्या खेळाडूला पुन्हा या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळता येणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळताना हार्दिकला ही दुखापत झाली होती. विश्वचषक हॉकी स्पर्धेतील भारताचा ड गटातील पुढील सामना वेल्सबरोबर 19 जानेवारीला भुवनेश्वरमध्ये होणार आहे. तर या गटातील इंग्लंड आणि स्पेन यांच्यातील सामनाही 19 जानेवारीलाच खेळविला जाईल. या दोन्ही सामन्यातील निकालानंतरच या गटातील चित्र स्पष्ट होईल. या गटात आघाडीच्या पहिल्या दोन संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळू शकेल. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी या गटातून प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णित राखला आहे. ड गटातील गुणतक्मत्यात इंग्लंडचा संघ सरस गोल सरासरीच्या जोरावर पहिल्या स्थानावर असून भारत दुसऱया स्थानावर आहे.









