वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
सध्या ओडिशामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतून भारतीय संघातील मध्यफळीत खेळणारा हुकमी हॉकीपटू हार्दिक सिंगला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागत आहे.
24 वर्षीय हार्दिकला स्नायू दुखापत झाली होती. 15 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली. दरम्यान या दुखापतीवर वैद्यकीय उपचार सुरू असले तरी तो या दुखापतीतून पूर्णपणे बरा होऊ शकणार नसल्याने तो या संपूर्ण स्पर्धेत यापुढे खेळू शकणार नाही, अशी माहिती हॉकी इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. या स्पर्धेतील स्पेनबरोबरच्या सलामीच्या सामन्यात हार्दिक सिंगने शानदार गोल नोंदवला होता. या स्पर्धेतील भारताच्या वेल्सबरोबरच्या पुढील सामन्यात तो खेळू शकला नाही. क गटात भारत आता तिसऱया स्थानावर आहे. आता भारताला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी रविवारी क्रॉस ओव्हर सामन्यात न्यूझीलंडशी लढत द्यावी लागणार आहे. स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे जरुरीचे आहे.









